पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका मशिदीत आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला असून १६९ जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी प्रार्थनेच्या वेळी हा हल्ला झाला. हल्लेखोराने मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतःला उडवून दिले. कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. हा हल्ला उझबेकिस्तानच्या अध्यक्षांच्या भेटीदरम्यान झाला.
इस्लामाबादमध्ये शुक्रवारी एका शिया मशिदीत झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ३१ जण ठार आणि १६९ जण जखमी झाले. हा हल्ला पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी मानवतेवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये तीन महिन्यांत झालेला हा दुसरा आत्मघाती हल्ला आहे.
इस्लामाबादच्या तलाई परिसरातील खदिजातुल कुबरा या शिया पंथियांच्या मशिदीत हा भीषण हल्ला झाला. शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी जमलेल्या भाविकांमध्ये एका आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले. हल्लेखोर मशिदीत शिरण्याचा प्रयत्न करत असताना त्याला प्रवेशद्वाराजवळ रोखण्यात आले, तेव्हा त्याने स्फोटके उडवून दिली. या हल्ल्यात ३१ निष्पाप लोकांचा बळी गेला, तर १६९ जण जखमी झाले. इस्लामाबादचे पोलिस उपायुक्त इरफान मेमन यांनी ही माहिती दिली.पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, "प्रार्थनास्थळावर आत्मघाती हल्ला करून निष्पापांना मारणे हा मानवतेवरील हल्ला असून या घटनेचा करू तेवढा निषेध कमी आहे."
सध्या तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, हल्लेखोर हा परदेशी नागरिक असून त्याचे तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या गटाशी संबंध असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
विशेष म्हणजे, उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झीयएव्ह हे पाकिस्तानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतानाच हा हल्ला झाला. यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी इस्लामाबादमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाबाहेर झालेल्या अशाच एका आत्मघाती हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता.