भारतीय युवा संघाचे ‘वैभव’शाली विजेतेपद

महाराष्ट्र टाइम्स

भारतीय युवकांनी १९ वर्षांखालील वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात इंग्लंडवर १०० धावांनी मात केली. वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची धडाकेबाज खेळी केली. भारताने प्रथम फलंदाजी करत ४११ धावा केल्या. इंग्लंडला ३११ धावांत रोखले. हे भारतीय संघाचे सहावे विजेतेपद आहे. वैभवच्या खेळीने सामना भारताच्या बाजूने झुकवला.

indian youth teams grand victory over england by 100 runs
भारताच्या युवा क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील गटाच्या वन-डे वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या वादळी खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ४११ धावांचा डोंगर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांत गुंडाळला गेला. या विजयासह भारतीय युवकांनी सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. वैभवच्या अविश्वसनीय खेळीने भारताला मोठा विजय मिळवून दिला.

वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूंमध्ये १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीने १७५ धावांची अशी काही खेळी केली की प्रेक्षकांना अक्षरशः दाद द्यावी लागली. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारतीय संघाने पहिल्या २५ षटकांतच २५० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी सामना किती मोठ्या फरकाने जिंकला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वैभव बाद झाल्यानंतरच्या २५ षटकांत भारताने १६१ धावा केल्या, ज्या विजयासाठी पुरेशा ठरल्या.
भारताच्या डावाची सुरुवात थोडी संथ झाली. ॲरॉन जॉर्ज ९ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभव आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी ९० चेंडूंमध्ये १४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आयुषने ५१ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या. वैभवने त्यानंतर वेदान्त त्रिवेदीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूंमध्ये ८९ धावांची भर घातली. वेदान्तने ३२ धावांचे योगदान दिले. विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू आणि कनिष्क चौहान यांनीही वैभवच्या खेळीतून प्रेरणा घेतली. अभिज्ञानने ४० धावा केल्या, तर कनिष्क चौहानने २० चेंडूंमध्ये ३ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ३७ धावांची जलद खेळी केली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारताने ४११ धावांचा मोठा स्कोर उभारला.

वैभव सूर्यवंशीची खेळी खरोखरच दोन संघांमधील फरक स्पष्ट करणारी होती. त्याने अवघ्या ३२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरची ५० धावाही त्याने केवळ २३ चेंडूंमध्ये केल्या. विशेष म्हणजे, शंभर ते दीडशे धावांचा टप्पा त्याने अवघ्या १६ चेंडूंमध्ये गाठला. शतकानंतर त्याने २५ चेंडूंमध्ये ७५ धावांची तुफानी खेळी केली, ज्यात सात चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. त्याच्या फटकेबाजीपुढे इंग्लंडचे गोलंदाज हतबल झाले होते. एका क्षणी त्याने ग्रीनच्या उसळत्या चेंडूवर मारलेला फोरहँडचा षटकार सर्वांच्या लक्षात राहिला.

वैभव बाद झाल्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज थोडे जोशात आले आणि त्यांनी भारतीय धावगतीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत भारताने ४०० धावांचा टप्पा ओलांडला होता. इंग्लंडसमोर विजयासाठी षटकामागे आठपेक्षा जास्त धावांचे लक्ष्य होते. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली. त्यांनी पहिली दोन षटके निर्धाव टाकून सामन्यावर आपली पकड मजबूत केली. इंग्लंडचे अर्धशतक नवव्या षटकात, तर शतक १४ व्या षटकात झाले. इंग्लंडची धावगती चांगली होती, पण एका क्षणी त्यांची अवस्था ३ बाद १७४ वरून ७ बाद १७७ अशी झाली.

यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीतील सेलेब फॉकनरने आक्रमक शतकी खेळी करून संघासाठी आशा निर्माण केल्या. त्याने ६७ चेंडूंमध्ये नऊ चौकार आणि सात षटकारांसह ११५ धावा केल्या. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने फारशी साथ मिळाली नाही. भारतीय गोलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट्स घेत इंग्लंडवरील दबाव कायम ठेवला. आर. एस. अंबरीशने ९ षटकांत ५६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. दीपेश देवेंद्रनने ६ षटकांत ६४ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. कनिष्क चौहानने ८.२ षटकांत ६३ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या, तर आयुष म्हात्रेने ५ षटकांत ३१ धावा देऊन १ विकेट घेतली. या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांत सर्वबाद झाला.

या विजयामुळे भारतीय युवकांनी दोन वर्षांपूर्वी हुकलेले विजेतेपद या वेळी जिंकले. हा विजय भारतीय क्रिकेटसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे.

संक्षिप्त धावफलक:

भारत: ५० षटकांत ९ बाद ४११ धावा.
प्रमुख धावा: वैभव सूर्यवंशी १७५, आयुष म्हात्रे ५३ (५१ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकार), वेदान्त त्रिवेदी ३२, अभिज्ञान कुंडू ४०, कनिष्क चौहान नाबाद ३७ (२० चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकार).
इंग्लंडचे गोलंदाज: ॲलेक्स ग्रीन ५-०-४९-२, जेम्स मिंटो ८-०-६३-३.

इंग्लंड: ४०.२ षटकांत सर्व बाद ३११ धावा.
प्रमुख धावा: बेन डॉकिन्स ६६ (५६ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकार), बेन मायेस ४५ (२८ चेंडूंत ७ चौकार आणि २ षटकार), थॉमस रेव ३१ (१८ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकार), सेलेब फॉकनर ११५, जेम्स मिंटो २८.
भारताचे गोलंदाज: आर. एस. अंबरीश ९-१-५६-३, दीपेश देवेंद्रन ६-०-६४-२, कनिष्क चौहान ८.२-०-६३-२, आयुष म्हात्रे ५-०-३१-१.