रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध

महाराष्ट्र टाइम्स

नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याने ऑलिम्पियन अर्जुन बबुताला मागे टाकले. अर्जुनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या दोघांनी विशालसिंगच्या साथीने सांघिक सुवर्णपदकही जिंकले. पात्रता फेरीतही रुद्रांक्ष अव्वल होता. ज्युनियर गटातही भारताने वर्चस्व राखले.

रुद्रांक्ष पाटीलचा सुवर्णवेध
माजी जागतिक विजेता नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताची शान वाढवली. त्याने ऑलिम्पियन अर्जुन बबुताला मागे टाकत हे यश मिळवले. या स्पर्धेत वरिष्ठ गटात भारताने आतापर्यंत एकूण १८ पदके पटकावली आहेत.

२२ वर्षीय रुद्रांक्ष पाटीलने अंतिम फेरीत २५१.९ गुणांची उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने आपलाच सहकारी आणि ऑलिम्पियन अर्जुन बबुताला (२५०.७ गुण) मागे टाकत सुवर्णपदक पटकावले. या दोघांनी विशालसिंगच्या साथीने सांघिक प्रकारातही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. पात्रता फेरीतही रुद्रांक्ष ६३२.१ गुणांसह अव्वल स्थानी होता. अर्जुन बबुता (६२८.० गुण) आणि विशाल (६२४.६ गुण) हे दोघेही अंतिम आठ नेमबाजांमध्ये पोहोचले होते. या तिघांनी मिळून १८८४.७ गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकले. त्यांनी कझाकस्तान (१८७९.४ गुण) आणि जपानच्या (१८७७.२ गुण) संघांना मागे टाकले. ज्युनियर मुलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेतही भारताने आपले वर्चस्व कायम राखले.