पाकिस्तानात स्फोटात ३१ ठार

महाराष्ट्र टाइम्स

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शुक्रवारी एका मशिदीत आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला असून १६९ जण जखमी झाले आहेत. मशिदीत प्रवेश करताना हल्लेखोराने स्वतःला उडवून घेतले. हा हल्ला उझबेकिस्तानच्या अध्यक्षांच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान झाला. कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

suicide attack in pakistan 31 dead 169 injured
इस्लामाबादमध्ये शुक्रवारी एका आत्मघाती हल्लेखोराने शिया पंथियांच्या मशिदीत स्फोट घडवून आणला. या भीषण हल्ल्यात ३१ जणांचा मृत्यू झाला, तर १६९ जण जखमी झाले. हा हल्ला राजधानी इस्लामाबादमध्ये गेल्या तीन महिन्यांतील दुसरा आत्मघाती हल्ला आहे. मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी मोठी गर्दी जमली असताना, हल्लेखोराने प्रवेशद्वाराजवळ स्वतःला उडवून दिले. सध्या तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही, मात्र हल्लेखोर परदेशी असून त्याचे तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ( टीटीपी ) शी संबंध असल्याचा अंदाज आहे. उझबेकिस्तानच्या अध्यक्षांच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान हा हल्ला झाल्याने चिंता वाढली आहे.

इस्लामाबादच्या तलाई परिसरातील खदिजातुल कुबरा या मशिदीत हा धक्कादायक प्रकार घडला. शुक्रवारी दुपारच्या प्रार्थनेसाठी अनेक मुस्लिम बांधव मशिदीत जमले होते. त्याचवेळी एका आत्मघाती हल्लेखोराने मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षकांनी अडवले. यानंतर, हल्लेखोराने आपल्या अंगावर बांधलेले स्फोटके उडवून दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की त्यात अनेक जण ठार झाले आणि मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले.
या हल्ल्यात ३१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, १६९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.

विशेष म्हणजे, हा हल्ला उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झीयएव्ह यांच्या दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर असताना झाला. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

सध्या तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी प्राथमिक तपासात हल्लेखोर हा परदेशी नागरिक असून त्याचे संबंध तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी गटाशी असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.