अमेरिका जर बोईंगसारखी आधुनिक विमाने बनवण्याचा अभिमान बाळगत असले तर भारताकडेही हजारो वर्षांपूर्वी पुष्पक विमानासारखे विमान तंत्रज्ञान होते, असे मत राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. शहरातील धरमपेठ सायन्स कॉलेजमध्ये विदर्भ विज्ञान उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. भारताच्या प्राचीन ज्ञान पद्धती आजही प्रासंगिक असून तो आपल्या देशाचा सर्वात मोठा बौद्धिक खजिना आहे, असेही ते म्हणाले.
विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ व धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या सहयोगाने आयोजित विदर्भ विज्ञान महोत्सव व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अंबाझरी तलावाजवळील धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात मंत्री लोढा यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी मंचावर पीडब्ल्यूडी नागपूर विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. माने, लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, विज्ञान भारतीचे क्षेत्र संघटन मंत्री श्रीप्रसाद जी, संरक्षक डॉ. सतीश वटे, धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर, सचिव प्रकाश इटनकर, धरमपेठ एम. पी. देव स्मृती विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अखिलेश पेशवे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांची प्रमुख उपस्थिती होती. इतर मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उल्हास औरंगाबादकर यांनी केले.
या प्रदर्शनात नागपूर जिल्ह्यातील बी.एस्सी. व एम.एस्सी. विद्यार्थ्यांचे सुमारे ४० विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.आज, शनिवारी या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. तसेच विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये ‘क्लायमेट चेंज’, ‘वन हेल्थ’ आणि ‘डिफेन्स’ या तीन मुख्य संकल्पनांवर आधारित रांगोळी, पोस्टर, विज्ञान मॉडेल व नाटिका स्पर्धा घेण्यात आल्या असून, त्यांची अंतिम फेरी येथे पार पडली. सूत्रसंचालन डॉ. कीर्ती पातुरकर यांनी केले आणि रुमा कापरे यांनी आभार मानले.
भारतीय स्वातंत्र्याचे श्रेय केवळ महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांना देणे हे ‘अर्ध सत्य’ आहे. हजारो अनामिक वीर - शेतकरी, कामगार, आदिवासी आणि सामान्य नागरिक यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यातील अनेकांची नावे कधीच कळणार नाहीत. त्यांनी कल्पना केलेला भारत आपण बनवला का, हे आपण स्वतःला विचारले पाहिजे, असेही लोढा म्हणाले.


