पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थकोट्यवधींचा निधी

महाराष्ट्र टाइम्स

पात्रूड गावात एका बनावट ट्रस्टच्या नावाने ४ कोटींहून अधिक निधी जमा करण्यात आला. हा निधी पॅलेस्टिनी नागरिकांना समर्थन देण्यासाठी असल्याचे सांगण्यात आले. एका खऱ्या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून हा गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोघांना ताब्यात घेतले आहे. जमा झालेला निधी धार्मिक कामाच्या नावाखाली स्वतःच्या फायद्यासाठी वापरला गेला.

billions of funds collected through fake trust in support of palestinians

अहिल्यानगर येथील ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून पात्रूड (ता. माजलगाव) गावात बनावट ट्रस्ट स्थापून धार्मिक कामाच्या नावाखाली ४ कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करण्यात आला. या प्रकरणी दहशतविरोधी पथकाने चार जणांविरुद्ध माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पॅलेस्टिनी नागरिकांना समर्थन देण्याचे कारण सांगून हा निधी संकलित करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाने पात्रूड (ता. माजलगाव) या गावात ही कारवाई केली. अहिल्यानगर येथील ‘फैजान ए-कन्झूल इमान’ ट्रस्टचा नोंदणी क्रमांक चोरून वापरत ‘गुलजार ए-रझा’ नावाच्या बनावट ट्रस्टद्वारे धार्मिक कामाच्या नावाखाली हा निधी जमा करण्यात आला. आरोपींनी पात्रूड येथे ‘गुलजार ए-रझा’ ट्रस्टचा फलक लावून आर्थिक व्यवहार सुरू केले होते. इम्रान कलीम शेख, मुजम्मिल नूर सय्यद, अहमदुद्दीन कैसर काझी, तौफीक जावेद काझी या चौघांनी या ट्रस्टची जिल्ह्यात अधिकृत नोंदणी न करता लातूरमधील खासगी बँकेत पाच बनावट खाती उघडली व मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करून गैरव्यवहार केला. जमा झालेला कोट्यवधींचा निधी धार्मिक उपक्रमांसाठी असल्याचे भासवून आरोपींनी तो स्वतःच्या फायद्यासाठी वळवला.