कोचिंग वर्गांतील चाचण्यांबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खासगी शिकवणी वर्गांतील चाचण्यांचे निकाल कधीही सार्वजनिक केले जात नाहीत. ते केवळ संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वैयक्तिक स्वरूपात कळवले जातात. निकालांची तुलना किंवा प्रदर्शनाचा प्रकार कोचिंग वर्गांमध्ये होत नाही, असेही भुयार यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांवरील वाढता मानसिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने शाळा आणि खासगी शिकवणी वर्गांसाठी लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांवर आता खासगी कोचिंग क्लासेसच्या शिखर संघटनेने उघड विरोध नोंदवला आहे. कोचिंग वर्गांवर निर्बंध आणत जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, अवघ्या एका दिवसात संघटना आक्रमक झाली असून, कोचिंग क्लासेसनाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षा, शाळा आणि खासगी शिकवणी वर्गांमधून विद्यार्थ्यांवर वाढत चाललेला मानसिक ताण, तक्रारींची वाढती संख्या तसेच सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश या पार्श्वभूमीवर सरकारने हा कडक निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना अतिरिक्त ताणतणावाचा सामना करावा लागू नये, यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत, जिल्हास्तरीय निरीक्षण समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयामुळे कोचिंग वर्गांच्या स्वायत्ततेवर गदा येत असल्याची भावना संघटनांनी व्यक्त केली आहे.
खासगी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना कोणताही मानसिक ताण दिला जात नाही, असा दावा शिखर संघटनेचे राज्य प्रवक्ते बंडोपंत भुयार यांनी केला. बहुतांश कोचिंग वर्गांमध्ये आठवड्यातून एक दिवस, प्रामुख्याने रविवारी, आधीपासूनच सुटी दिली जाते. ज्या ठिकाणी साप्ताहिक सुटी नाही, तेथेही यापुढे ती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर कोचिंग वर्गांची भूमिका सकारात्मक असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, कोचिंग क्लासेसचे संचालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांना सातत्याने मानसिक पाठबळ देत असतात. ते अनेकदा समुपदेशकाचीच भूमिका बजावत असतात. हे वास्तव सरकारने लक्षात घ्यायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांशी संबंधित बहुतांश समस्या या सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आढळून येतात. मात्र त्या अपयशांवर चर्चा करण्याऐवजी खासगी कोचिंग क्लासना विनाकारण यात ओढले जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.






