हिंगण्याजवळ समृद्धी महामार्गावर गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ट्रेलरवर बसवलेल्या क्रेनला अचानक आग लागली. पुण्याहून नागपूर जिल्ह्यातील मौदा पॉवर प्लान्टमध्ये बांधकाम कामासाठी हा ट्रेलर (एमएच-४०-डीएल-७६६०) क्रेन घेऊन जात होता. या क्रेनला अचानक आग लागली. चालक संथुल मंजूर अली यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वाहन थांबवले आणि केबिन ट्रेलर बॉडीपासून वेगळे केले. त्यामुळे सुदैवाने आग इंजिनपर्यंत पोहोचू शकली नाही. जवळच गस्तीवर असलेले हिंगणा पोलिस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र बोबडे घटनास्थळी धावले आणि त्यांनी ताबडतोब अग्निशमन दलाला सूचना दिली. हिंगणा नगरपंचायत आणि मिहान येथील अग्निशमन विभागाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि ३० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. क्रेन आणि ट्रेलर बॉडीचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किट किंवा घर्षणामुळे आग लागली असावी असा अंदाज आहे.








