बडोदा : न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्स म्हणजे भरवशाचे ‘पॅकेज’च. तो भारत दौऱ्यावर आलेल्या किवीज संघात आहे. वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत तो डाव्या हाताने फलंदाजी करत प्रतिस्पर्ध्यांना संभ्रमात पाडणार आहे.
३१ वर्षीय फिलिप हा आक्रमक फलंदाज . डावखुऱ्या फलंदाजीने मैदान गाजवण्याचे त्याचे ध्येय आहे. ३० डिसेंबर रोजी अलेक्झांड्रा येथे स्टॅग्स विरुद्ध व्होल्ट्स या सुपर स्मॅश क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यात आपल्या ९० धावांच्या खेळीदरम्यान फिलिपने काही फटके डाव्या हाताने तडकावले. एरव्ही उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फिलिपने डाव्या हाताने फलंदाजी करत कव्हर ड्राइव्हवर चौकार वसूल केला. तसेच डावखुरा स्पिनर जेडॉन लेनॉक्स याच्या चेंडूवर कव्हरवरून दमदार षटकार ठोकला तोदेखील डाव्या हाताने फलंदाजी करतच. यामुळे गोलंदाज संभ्रमात पडला अन् समालोचकही चक्रावले.
‘ डावखुरी फलंदाजी माझ्यासाठी हे नवी नाही. लहानपणापासून मी डाव्या हाताने फलंदाजीचा प्रयत्न करतो आहे. स्विचचा फटका मी सर्वप्रथम डाव्या हातानेच खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरावादरम्यान वेगवान आणि स्पिन अशा दोन्ही गोलंदाजांना मी डाव्या हाताने सामोरा जात हे तंत्र घोटवून घेत आहे. वर्ल्ड कप सामन्यात परिस्थितीनुसार मी डाव्या हाताने फलंदाजी करेन’, असे तो म्हणाला.



