अखेर ‘क्रीडा ई-प्रमाण’ला मुहूर्त

महाराष्ट्र टाइम्स

राज्यात क्रीडा ई-प्रमाण प्रणाली सुरू झाली आहे. यामुळे बोगस क्रीडा प्रमाणपत्रांना आळा बसेल. खेळाडूंना आता विभागीय कार्यालयात जावे लागणार नाही. ब्लॉकचेन आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. प्रमाणपत्र पडताळणी जलद होईल. डिजिटल पडताळणी अहवाल २४ तासांच्या आत मिळेल. यामुळे पारदर्शकता वाढेल.

अखेर ‘क्रीडा ई-प्रमाण’ला मुहूर्त
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

बोगस प्रमाणपत्रांद्वारे सरकारी नोकऱ्या आणि सवलती लाटण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘क्रीडा पोर्टल’ सुरू करण्यासाठी राज्याच्या क्रीडा विभागाचे अडीच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर या क्रीडा ई- प्रमाण’ प्रणालीस मान्यता मिळाली असून, खेळाडूंना आता विभागीय कार्यालयात हेलपाटे घालण्याची आवश्यकता राहणार नाही.

अडीच वर्षापूर्वी तत्कालिन क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी या ‘क्रीडा पोर्टल’बाबत ‘मटा’ला माहिती दिली होती. यास मूर्त रूप प्राप्त होण्यास अडीच वर्षे लागले. राज्यातील खेळाडूंना पाच टक्के आरक्षणाचा लाभ सुलभतेने आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी हा निर्णय झाला आहे. या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी, बोगस प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आणि पडताळणी प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर होईल. यात क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी ‘ब्लॉकचेन’ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यावर आधारित ‘ क्रीडा ई-प्रमाण ’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

भरतीपूर्वी खेळाडू उमेदवाराचे प्रमाणपत्र कोणत्याही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे अवैध ठरले, तर संबंधित खेळाडूकडे भरतीप्रक्रियेपूर्वीच्या कालावधीतील अन्य प्रमाणपत्रे असतील, तर ती त्याला क्रीडा ई-प्रमाण प्रणालीद्वारे पडताळणी करता येणार असून, ती नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करावी लागणार आहेत. संबंधित प्राधिकारी संबंधित प्रमाणपत्र क्यूआर कोडद्वारे ते वैध असल्याची खात्री करणार आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे माहितीची जुळवणी झाल्यास, संबंधित खेळाडूस डिजिटल पडताळणी अहवाल अर्ज केल्यानंतर तत्काळ किंवा चोवीस तासांच्या आत ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. पूर्वी, असा प्रकार घडल्यास संबंधित कार्यालयात पडताळणीसाठी तीस दिवसांचा कालावधी होता.