भय, मोहाच्या सापळ्यात अडकू नका

महाराष्ट्र टाइम्स

नागपूर विद्यापीठाच्या ११३ व्या दीक्षांत समारंभात डॉ. अनंत पंढरे यांनी विद्यार्थ्यांना भय आणि मोहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. पदवीधरांनी आत्मविश्वासाने आयुष्यात मोठी झेप घ्यावी. या समारंभात १४० प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एकूण ६१ हजार ८७१ विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका देण्यात आल्या.

भय, मोहाच्या सापळ्यात अडकू नका
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

विद्यार्थ्यांनी भय आणि मोहाच्या सापळ्यात अडकू नये. या सापळ्यात अडकलो तर आपली प्रगती खुंटते आणि त्यातून सुटका झाली तर दसपट उंची गाठता येते. विद्यार्थी अशा सापळ्यांमध्ये अडकणार नाही यासाठी शिक्षकांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंत पंढरे यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११३ व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते शुक्रवारी बोलत होते. नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर होत्या. विद्यापीठाचे राज्यपाल नामित सदस्य डॉ. समय बनसोड, कुलसचिव डॉ. राजू हिवसे तसेच विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते.

डॉ. पंढरे यांनी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हा काळ स्वत:वर विश्वास ठेवून भरारी मारण्याचा आहे असे सांगितले. विद्यार्थी पदक प्राप्त करतो, त्यावेळी त्याचे परिश्रम, कुटुंबाच्या अपेक्षा आणि ऊर्जा घेऊन दीक्षांत समारंभात येत असतो. हीच ऊर्जा आयुष्यात पूर्ण क्षमतेने वापरावी. नागपूर विद्यापीठाचा व्याप फार मोठा असून याच विद्यापीठातून पाच विद्यापीठे तयार झाली आहेत. दीक्षांत समारंभात उपस्थित असलेल्या आणि विविध परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची कष्ट, अभ्यास करून पुढे जाण्याची उर्मी वाखाणण्याजोगी आहे. आपल्याला मिळालेले ज्ञान हे आयुष्यात मोठी झेप घेण्यासाठी आहे हा विश्वास विद्यार्थ्यांनी बाळगावा. कोणत्याही संस्थेचे मोठेपण हे तेथील माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, असेही ते म्हणाले.

कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या विविधांगी प्रगतीचा अहवाल सादर केला. दीक्षांत समारंभात अर्थशास्त्र विषयात ९५ वर्षाचे असलेले डॉ. विनायक पांडे यांच्यावतीने मकरंद विनायक पांडे यांनी डी.लिट. पदवी स्वीकारली. डॉ. दीपक वानखेडे यांना भूगोलातील डी.लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली. वयाच्या ६५ व्या वर्षानंतर आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल घनश्याम मांगे यांना योगतज्ज्ञ डॉ. विठ्ठलराव जिभकाटे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दीक्षांत समारंभात हिवाळी २०२४ आणि उन्हाळी २०२५ परीक्षेत यश संपादन केल्याबाबत १४० प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १९४ सुवर्ण, ८ रजत व २७ रोख पारितोषिक असे एकूण २२९ पुरस्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या दीक्षांत समारंभात विद्याशाखानिहाय २७९ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत १२१, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत ५८, मानवविज्ञान विद्याशाखेत ८१, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत १९ आदींचा समावेश आहे. एकूण ६१ हजार ८७१ विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या. यामध्ये स्नातक पदवीधर ४९ हजार २३० विद्यार्थी तर स्नातकोत्तर पदवीधर १२ हजार ८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमृता इंदूरकर व डॉ. वर्षा देशपांडे यांनी केले.