पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थनिधी जमवून अपहार

महाराष्ट्र टाइम्स

माजलगाव तालुक्यातील पाथ्रुड गावात एका बनावट ट्रस्टच्या नावाने ४ कोटींहून अधिक निधी जमा करण्यात आला. हा निधी पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ असल्याचे सांगण्यात आले. अहिल्यानगर येथील एका ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून हा अपहार करण्यात आला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल असून दोघांना ताब्यात घेतले आहे. जमा झालेला निधी धार्मिक कामाऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आला.

major fraud committed by raising funds in support of palestinians

अहिल्यानगर येथील ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून पाथ्रुड (ता. माजलगाव) गावात बनावट ट्रस्ट स्थापून धार्मिक कामाच्या नावाखाली ४ कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करण्यात आला. या प्रकरणी दहशतविरोधी पथकाने चार जणांविरुद्ध माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पॅलेस्टिनी नागरिकांना समर्थन देण्याचे कारण सांगून हा निधी संकलित करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाने पात्रूड (ता. माजलगाव) या गावात ही कारवाई केली. अहिल्यानगर येथील ‘फैजान ए-कन्झूल इमान’ ट्रस्टचा नोंदणी क्रमांक चोरून वापरत ‘गुलजार ए-रझा’ नावाच्या बनावट ट्रस्टद्वारे धार्मिक कामाच्या नावाखाली हा निधी जमा करण्यात आला. आरोपींनी पाथ्रुड येथे ‘गुलजार ए-रझा’ ट्रस्टचा फलक लावून आर्थिक व्यवहार सुरू केले होते. इम्रान कलीम शेख, मुजम्मिल नूर सय्यद, अहमदुद्दीन कैसर काझी, तौफीक जावेद काझी या चौघांनी या ट्रस्टची जिल्ह्यात अधिकृत नोंदणी न करता लातूरमधील खासगी बँकेत पाच बनावट खाती उघडली व मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करून गैरव्यवहार केला. जमा झालेला कोट्यवधींचा निधी धार्मिक उपक्रमांसाठी असल्याचे भासवून आरोपींनी तो स्वतःच्या फायद्यासाठी वळवला.