भारतीय तरुण ‘सायबर गुलाम’

महाराष्ट्र टाइम्स

फेसबुकवरील नोकरीच्या आमिषाला बळी पडून कंबोडियात गेलेला एक भारतीय तरुण सायबर गुलाम बनला. काम करण्यास नकार दिल्याने त्याच्यावर चार महिने अमानुष अत्याचार झाले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास करताना हा प्रकार उघडकीस आणला. कंबोडियात असे अनेक भारतीय सायबर गुलाम बनले आहेत. हे रॅकेट चिनी नागरिक चालवतात.

भारतीय तरुण ‘सायबर गुलाम’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

फेसबुकवरील जाहिरातीला बळी पडून कंबोडियात नोकरीसाठी गेलेल्या एका तरुणाला ‘ सायबर गुलाम ’ बनवण्यात आले. काम करण्यास नकार दिल्यामुळे या तरुणावर चार महिने अमानुष अत्याचार करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिस एका गुन्ह्याचा तपास करीत असताना हा तरुण पोलिसांना सापडला आणि सर्व प्रकार उघडकीस आला.

पीडित तरुणाबरोबर २०२३मध्ये हा प्रकार घडला. तरुणाने फेसबुकवरील जाहिरातीवर विश्वास ठेवून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. दरमहा एक लाख रुपये पगाराचे आमिष दाखवण्यात आले. एजंटमार्फत त्याला कंबोडियाला पाठवण्यात आले. त्यासाठी तरुणाने अडीच लाख रुपये खर्च केले. मात्र, तेथे त्याला चिनी नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले. सायबर फसवणूक, ऑनलाइन गैरव्यवहार आणि संशयास्पद डिजिटल व्यवहार करण्यास त्याला भाग पाडण्यात आले. ही कामे करण्यास पीडिताने ठाम नकार दिला. ‘तीन लाख रुपये भरल्यासच सोडू,’ असा थेट दम चिनी नागरिकांनी त्याला दिला. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. कोणाशीही संपर्क साधू दिला जात नव्हता. चार महिने एका खोलीत डांबून ठेवून वारंवार मारहाण करण्यात आली. तरीही पीडित तरुण न बधल्याने अखेर चार महिन्यांनी त्याला सोडण्यात आले.

कंबोडियामध्ये ५० ते ६० भारतीयांना ‘सायबर गुलाम’ बनविण्यात आले आहे. काम न करणाऱ्याला मारहाण, विजेचे झटके देणे, बोट कापणे, महिला असल्यास बलात्काराची धमकी देणे, अत्याचार केले जातात. हे रॅकेट चिनी नागरिक चालवतात, असे पीडित तरुणाने सांगितले.