बंगालमध्ये छापे, दिल्लीत गोंधळ

महाराष्ट्र टाइम्स

पश्चिम बंगालमधील आयपॅक कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. डेरेक ओब्रायन आणि महुआ मोईत्रा यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे दिल्लीतील वाहतूक विस्कळीत झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध केला.

बंगालमध्ये छापे, दिल्लीत गोंधळ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पश्चिम बंगालमधील ‘इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी’च्या (आयपॅक) कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यांच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दिल्लीतील नवीन सेंट्रल व्हिस्टातील गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी आक्रमक निदर्शने केली. डेरेक ओब्रायन व महुआ मोईत्रा यांनी रस्त्यावरच लोळण घेतली. पोलिसांनी त्यांना उचलून गाडीत बसवले. निदर्शन करणाऱ्या खासदारांना संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, शताब्दी रॉय, महुआ मोइत्रा, बापी हलदर, साकेत गोखले, प्रतिमा मंडल, कीर्ती आझाद, डॉ. शर्मिला आदी खासदार गृहेमंत्रालयाबाहेर जमले. गृहमंत्री शहा यांच्या निषेधाचे फलक त्यांच्याकडे होते. मंत्रालयाच्या बाहेर रस्त्यावर या खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली व काही वेळात पोलिस तेथे दाखल झाले. या आंदोलनामुळे जनपथ, राजेंद्रप्रसाद रस्ता, कर्तव्यपथ, अशोक रस्ता, फिरोजशहा रस्ता भागांतील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी खासदारांना गाडीत बसण्याची विनंती केली तेव्हा मोइत्रा व ओब्रायन रस्त्यावर आडवे पडून वृत्तवाहिन्यांना बाइट देऊ लागले. पोलिसांनी नंतर त्यांना ताब्यात घेतले.

निदर्शन करणाऱ्या खासदारांना पोलिसांनी दिलेल्या वागणुकीचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तीव्र निषेध केला. लोकप्रतिनिधींसोबतची केंद्र सरकारची ही वागणूक लज्जास्पद, अस्वीकार्ह आणि लोकशाही हक्कांवर हल्ला असल्याची टीका त्यांनी केली. ‘लोकशाही अधिकाराचा वापर करण्यासाठी निवडून आलेल्या प्रतिनिधींना रस्त्यावर ओढत नेणे ही कायद्याची अंमलबजावणी नाही, तर हा गणवेशातील अहंकार आहे. भारत एक लोकशाहीचा आहे, भाजपची खासगी मालमत्ता नाही. सत्तेत असलेल्यांच्या सोयी किंवा सोयीनुसार दिल्लीत गृहमंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर चालत नाही’, अशी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली आहे.