जिल्हा परिषदांच्यानिवडणुका जाहीर

महाराष्ट्र टाइम्स

राज्यात जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विदर्भातील जिल्हा परिषदा वगळता इतर १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होईल. ७ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडेल. या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. सुमारे २५ हजार मतदान केंद्रे सज्ज आहेत. मतदारांसाठी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आली आहेत.

district council election schedule announced

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे मतदान अवघ्या ४८ तासांवर आले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी विदर्भ वगळता १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली. या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.

जिल्हा परिषदांच्या एकूण ७३१; तर पंचायत समित्यांच्या एक हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली.

या निवडणुकांसाठीही एक जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदारयाद्यांचाच वापर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारात नाही; परंतु दुबार नावांबाबत मात्र आयोगाने पुरेपूर दक्षता घेतली आहे. संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकांसाठी सुमारे २५ हजार ४८२ मतदान केंद्रे असतील. व्यवस्था करण्यात आली आहे. पुरेशी मतदान यंत्रे (ईव्हीएम) उपलब्ध करण्यात आली असून, त्यात ५१ हजार ५३७ कंट्रोल युनिट आणि एक लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिट आहेत.