‘ दुबार मतदार दिसला की त्याला तुडवा’, अशा काही राजकीय पक्षांच्या पवित्र्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने पोलिसांना दिले आहेत. मतदान केंद्राच्या परिसरात कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना कायदा हाती घेण्यापासून रोखण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. काही राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांना दुबार मतदारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदान केंद्र ांच्या बाहेर हाणामारी झाल्याच्या घटना नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांदरम्यान घडल्याचे दिसून आले होते. त्याची पुनरावृत्ती महापालिका निवडणुकीत होऊ नये. कार्यकर्त्यांकडून मतदारांची ओळखपत्रे तपासण्याचे प्रकार होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी नजर ठेवावी, असेही आयोगाने स्पष्ट केले . ‘मतदान केंद्र परिसरात तपासणी करण्याचे अधिकार नाहीत. अशा घटना घडू नयेत, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत’, असे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.








