राज्यातील तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने जपान सरकारसोबत चर्चा सुरू केल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी दिली. ‘याबाबत येत्या तीन महिन्यांत याबाबाबत निर्णय घेतला जाईल,’ असेही लोढा यांनी स्पष्ट केले.
जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी बुधवारी मंत्रालयात लोढा यांची त्यांच्या दालनात शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची जपानमध्ये मोठी मागणी असून, रोजगाराची संधी असल्याचे या वेळी झालेल्या प्राथमिक चर्चेतून स्पष्ट झाले. या वेळी अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, माधवी सरदेशमुख आदी उपस्थित होत्या.
‘जागतिक स्तरावर भारतीय मनुष्यबळ क्रियाशील ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कौशल्य विकासावर अधिक भर आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग कार्यरत असून, विविध देशांमध्ये राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधिनीद्वारे योग्य कौशल्य प्रशिक्षण आणि जपानी भाषेचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे लोढा म्हणाले.
जपानमध्ये कृषी, वैद्यकीय, विविध तंत्रज्ञ, बांधकाम आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे कानो ताकायुकी यांनी सांगितले. भारतीय तरुण अधिक कार्यक्षमतेने काम करत असून, भारतीय कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जगभरात मोठ्या आदराने रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. सध्या जपानच्या होक्काईडो प्रांतात आवश्यक असलेल्या मनुष्यबळावर या बैठकीत चर्चा झाली असून, जपानमधील इतर प्रांतांतही असलेल्या संधीची पुढील काळात चाचपणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.








