In An Accident Involving Three Cars In Lonavala A 10 year old Girl Dies Seven Injured
तीन कारच्या अपघातातमुलीचा मृत्यू; सात जखमी
महाराष्ट्र टाइम्स•
लोणावळ्याजवळ जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री तीन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका १० वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. सात जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. भरधाव वेगात असलेल्या एका कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
लोणावळ्याजवळ जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री दीडच्या सुमारास तीन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका १० वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या एका कारचालकाने ओव्हरटेक करताना गाडीवरील नियंत्रण गमावले आणि ही कार मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या दोन गाड्यांना समोरासमोर धडकली. या घटनेनंतर कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात अमिना साजिद मालदार (वय १०, रा. खालापूर, रायगड) या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींमध्ये अनिस अब्बास पटेल (वय ५३, रा. सिंहगड रस्ता), संकेत तुकाराम कोळेकर, आकाश अनंत कांगणे (दोघेही रा. पनवेल, रायगड), जैनुद्दीन हुसेमिया मालदार, रिहाना जैनुद्दीन मालदार, फारिया साजिद मालदार आणि साजिद जैनुद्दीन मालदार (सर्व रा. खालापूर) यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी अनिस अब्बास पटेल यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी साजिद जैनुद्दीन मालदार (वय ४२) याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे वेगाने जाणाऱ्या एका अर्टिगा कारचा चालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. ही भरधाव कार थेट मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या दोन कारवर आदळली. या धडकेत अर्टिगा कारमधील १० वर्षांची अमिना मालदार हिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप दिसून आला. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. या अपघातामुळे जुन्या महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.