नांदेड-वाघाळा महापालिकेच्या २० प्रभागांतील ८१ नगरसेवक निवडीसाठी गुरुवारी अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. सायंकाळी साडेपाचनंतरही अनेक केंद्रांवर मतदारच्या रांगा होत्या. त्यामुळे एकूण मतदानात वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरासरी ५५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तब्बल सात वर्षांनंतर नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत २० प्रभागांतील ८१ उमेदवार निवडून आणावयाचे आहेत. त्यासाठी तब्बल ४९१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळच्या सत्रात संथपणे मतदान झाले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ७.१६ टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेनंतर मात्र मतदारांची गर्दी पाहण्यास मिळाली. अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ४१.६५ टक्के झाले. सायंकाळी चारनंतर अनेक केंद्रांवर गर्दी कायम होती. यामुळे साडेपाच वाजेपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार आहे. नांदेड शहरात काही किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रतिक्रया सुरळीत होती.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५ लाख १ हजार ७९९ पैकी २ लाख ९ हजार २५ मतदारांनी (४१.६५ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजेची घंटा वाजताच मतदान केंद्राचे द्वार बंद झाले. रांगेत असलेल्या मतदारांचे मतदान घेण्यात आले. अनेक केंद्रांवर मोठ्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदानांची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे मतदानांची अंतिम आकडेवारी रात्री उस उशिराने सांगता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी ५५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.








