शेवटच्या टप्प्यापर्यंत धाकधूक, धावपळ

महाराष्ट्र टाइम्स

शहरात पहिल्यांदाच प्रभागनिहाय महानगरपालिका निवडणूक पार पडली. मतदारांना चार उमेदवारांना मतदान करताना गोंधळ उडाला. प्रभागाची व्याप्ती मोठी असल्याने अनेक मतदारांना दूरवरच्या मतदान केंद्रांपर्यंत जावे लागले. मतदार यादीतील चुका आणि मतदान केंद्रावरील क्रम बदलण्यावरून काही ठिकाणी आक्षेप घेण्यात आले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

tension and rush in constituency election voters face issues and candidates worry

प्रभागाच्या व्याप्तीमुळे मतदान केंद्र दूर असलेल्या मतदारांना मतदानासाठी धावपळ करावी लागली. प्रभागातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेताना उमेदवारांचीही धावपळ सुरू होती. प्रभागात उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे धाकधूक आणि धावपळीचे वातावरण दिसत होते.

महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरात पहिल्यांदाच प्रभागनिहाय मतदान पार पडले. चार उमेदवारांना कसे मतदान करायचे, चिन्ह कसे शोधायचे असे विविध प्रश्न मतदारांना पडले होते. त्यामुळे मतदान केंद्रावर उमेदवारांच्या नावांची आणि चिन्हांची यादी पाहून मतदार मतदानासाठी जात होते. प्रभागाची व्याप्ती मोठी असल्यामुळे अनेकांना दूरवरच्या मतदान केंद्रापर्यंत जावे लागले. मिलिंदनगर, कबीरनगर, हमालवाडा भागातील मतदारांचे केंद्र सिल्कमिल कॉलनीतील मोईनउल शाळा होते. शाळेत आणि परिसरात एकूण सहा केंद्र असल्यामुळे दूरवरून असलेल्या मतदारांचा गोंधळ उडाला. उमेदवारांचे प्रतिनिधी आणि केंद्र प्रतिनिधींकडे विचारणा करण्यासाठी गर्दी झाली होती. काही मतदारांची नावे यादीत नसल्याने दुसरीकडे विचारणा करण्यासाठी गेले होते. दुपारपर्यंत मतदान कमी झाले होते. त्यामुळे उमेदवारांची चिंता वाढली होती. उमेदवारांची यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर भागीरथीबाई प्राथमिक शाळा केंद्र, गुरू तेगबहादूर हायस्कूल केंद्र आणि सार्वजनिक बांधकाम विभाग केंद्रावर मतदारांची गर्दी झाली होती. त्यामुळे सायंकाळच्या टप्प्यात उशिरापर्यंत रांगा लागलेल्या होत्या.

क्रम बदलण्यावर आक्षेप

प्रभागनिहाय ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ या क्रमाने मतदान प्रक्रिया अपेक्षित होती. मात्र, काही मतदान केंद्रात ‘ड’, ‘क’, ‘ब’, ‘अ’ असा क्रम बदलण्यात आला. या बदलावर वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतला. त्यामुळे काही केंद्रांवर नियोजित पद्धतीने मतदान झाले. काही ठिकाणी बदललेल्या क्रमाने मतदान घेण्यात आले. या बदलामुळे चौघांचे पॅनल असलेल्या उमेदवारांना फायदा होईल. पण, एक किंवा दोन उमेदवार असलेल्या पक्षांचे मतदान कमी होईल, असे ‘वंचित’चे महेश निनाळे यांनी सांगितले.

मतदारयादीत चुका..!

मतदारयादीत नावे शोधताना काहींची धांदल उडाल्याचे मतदारांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीतील अग्रेसन विद्यामंदिर मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला. मतदान संपण्यास काही कालावधी बाकी असताना मतदान केंद्रात प्रवेश करण्यावरून उमदेवारांच्या समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचे कळते. घटना कळताच दोन्ही गटाकडील कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमा झाले. मतदान संपल्यानंतरही काहीवेळ केंद्राबाहेर जमाव होता. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर कार्यकर्ते परतले. तर केंद्रावर तातडीने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी भेट दिली.