युतीचा जल्लोष

महाराष्ट्र टाइम्स

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युतीने मोठा विजय मिळवला. भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करत होते. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. मात्र, शिवसेना (उबाठा) आणि मनसे युतीला अपेक्षित यश मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनेही काही जागांवर आनंदोत्सव साजरा केला.

alliance victory in thane celebration fireworks and orange flags

गुलालाची उधळण...फटाक्यांची आतषबाजी आणि पक्षाचे झेंडे फडकावत ठाण्यातील रस्त्यांवर महानगरपालिका निवडणुकीतील विजयाचा जल्लोष शुक्रवारी साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिलेदार विजयी होताच भगवे झेंडे हातात घेत युतीचे कार्यकर्ते जल्लोष करत होते. तर भाजपच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडताच मिठाई भरवून कार्यकर्ते तोंड गोड करत होते. या विजयाच्या रणधुमाळीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनीही मतमोजणी केंद्रांसह उमेदवारांच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळपर्यंत शहरात शिवसेना (उबाठा) - मनसे युतीला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या गोटात शुकशुकाट होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राबोडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) कळवा - मुंब्र्यात विजयी जागांवर आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे 'कुठे हासू आणि कुठे आसू' असे चित्र पाहायला मिळाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याने पुन्हा एकदा त्यांच्याच बाजूने कौल दिल्याने शिवसैनिकांमध्ये चैतन्य पसरले. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षातील दोन ते तीन माजी नगरसेवकांचा अपवाद वगळता बहुसंख्य माजी नगरसेवकांनी शिंदे यांचीच साथ दिली होती. निवडणुकीत शिवसेनेने भाजपसह युती करत सायंकाळपर्यंत सर्वाधिक जागांवर विजयी आघाडी घेतली होती. तर शिवसेना (उबाठा) - मनसे युतीला ठाणेकरांनी सपशेल नाकारल्याचे चित्र दिसून आले. सकाळी सर्वप्रथम प्रभाग क्रमांक : १९ मधून शिवसेनेचे विकास रेपाळे, नम्रता भोसले - जाधव, मीनल संख्ये आणि राजेंद्र फाटक यांनी विजयाचा गुलाल उधळला. यापाठोपाठ राबोडी प्रभाग क्रमांक : १० चे राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, सुहास देसाई, वहिदा खान, पूनम माळी यांच्या पॅनलने विजयाचे खाते उघडले. शहरातील विविध प्रभागाच्या जागांचे कौल हाती येताच जागोजागी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा करत विजयी उमेदवारांना खांद्यावर घेत घोषणाबाजी केली.