‘लक्ष द्या,’ असा लाऊड स्पीकरमधून आवाज येताच सर्व कार्यकर्ते शांत व्हायचे. उमेदवारांना मिळालेली मते निवडणूक अधिकारी जाहीर करताच पिछाडीवरील उमेदवारांच्या गोटात शांतता तर, त्याउलट जिंकलेल्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू व्हायचा. पुढच्या फेरीत हेच चित्र उलटे दिसायचे. असेच वातावरण शुक्रवारी मुंबईतील मतमोजणी केंद्रावर दिसले. आघाडी-पिछाडीच्या या धाकधुकीत ‘अपना अपना अंदाज’ व्यक्त करणारे कार्यकर्तेही कमी नव्हते, हेही विशेष!
दक्षिण मुंबईतील ए, बी आणि सी वार्ड मधील प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया नागपाडा येथील रिचर्डसन अँड कुड्रास कंपनीच्या प्रांगणात असलेल्या मतमोजणी केंद्रावर ठेवण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जे. जे. पूल मार्गावर हे मतमोजणी केंद्र असल्याने वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. सकाळी १० वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मात्र एकावेळी दोनच प्रभाग मोजणीसाठी घेतले जात असल्याने नंतर मोजणीसाठी येणार असलेल्या प्रभागांचे कार्यकर्ते निघून गेले. मात्र ज्यांच्या प्रभागाने मतमोजणीला सुरुवात झाली, त्या प्रभागातील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर निवडणूक अधिकारी लाऊडस्पीकरून निकाल जाहीर करत होते. ज्या उमेदवाराला जास्त मते, त्या उमेदवाराचे समर्थक घोषणाबाजी करत तर दुसरीकडे पिछाडीवर पडलेल्या उमेदवाराचे कार्यकर्ते अधिक-वजाबाकीचे गणित मांडताना दिसत होते. एक, दोन, तीन, चार फेऱ्यांच्या निकालानंतर प्रत्येक घोषणेच्या वेळी वेगवेगळे वातावरण पाहायला मिळत होते. या कार्यकर्त्यांना पांगवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. अखेर विजयी झाल्याची घोषणा होताच कार्यकर्ते जोरदार जल्लोष साजरा करीत होते. आपला उमेदवार विजयी झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन आल्यावर त्याला घेऊन पुन्हा जल्लोष केला जात होता. काहींनी तर फटाक्यांची आतषबाजीही केली. तर, दुसरीकडे पराभव झालेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते निराश होऊन पराभवाची कारणे शोधत घरी परतत होते.








