सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला काठावरचे संख्याबळ मिळाले आहे. महापालिकेतील ७८ जागांपैकी भाजपला ३९ जागा मिळवता आल्या असून, स्पष्ट बहुमतासाठी ४० जागांची आवश्यकता आहे.
भाजपला या निवडणुकीत या अगोदरच्या ४१ इतक्या संख्याबळापर्यंत मजल मारता आली नाही. १८ जागा जिंकून काँग्रेस पक्ष दुसऱ्या स्थानावर; तर राष्ट्रवादी काँग्रेसने १६ जागांवर बाजी मारली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन; तर शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
निवडणुकीत ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. भाजप , काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये लढत होती. एकूण ४ लाख ५४ हजार मतदारांपैकी २ लाख ७७ हजार ३४६ मतदारांनी ५२७ मतदान केंद्राच्या माध्यमातून गुरुवारी मतदानाचा हक्क बजावला होता.
मतमोजणी काल शुक्रवारी मिरज येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने काँग्रेसचा एका मोठ्या गटाच्या नेत्या जयश्री पाटील आणि काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले होते. त्यामुळे निवडणुकीत भाजपला तगडा विरोधक कोण, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यासारखी परिस्थिती होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन माजी महापौरांसह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील दिग्गजांना आपल्यात सामील करून घेतले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप)ने आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
भाजपही स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शिंदे यांच्या शिवसेनेलाही नाइलाजाने अखेरच्या क्षणी जे उमेदवार मिळतील त्यांना एबी फॉर्म देऊन निवडणुकीत उडी घ्यावी लागली. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही स्वबळावरच निवडणुकीच्या मैदानात होती.
विजयी उमेदवारांकडून गुलालाची उधळण करून आणि मिरवणूक काढून जल्लोष करण्यात येत होता. तिन्ही शहरांत तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.








