इचलकरंजी महापालिकेची स्थापना झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने ६५ पैकी ४७ जागांवर विजय मिळवून एकतर्फी सत्ता मिळवली. अपेक्षेप्रमाणे भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या. शेवटच्या क्षणी स्थापन झालेल्या विरोधी शिवशाहू विकास आघाडीला १७ जागा मिळाल्या.
महायुतीमध्ये भाजपला ४३, शिवसेना शिंदे गटाला ३, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १, शिवशाहू विकास आघाडीला १७; तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १ जागा मिळाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर व आमदार राहुल आवाडे यांची एकत्रित ताकद महायुतीच्या विजयाने सिद्ध झाली.
या निवडणुकीत एकूण १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी २३० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. राजीव गांधी भवन येथे निवडणूक अधिकारी पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी मतमोजणी सुरू झाली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर शहरात महायुतीची हवा तयार झाली होती. त्यानंतर आवाडे आणि हाळवणकरांनी एकत्रित ताकद लावली. सोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीला घेतले. जेथे शक्य नाही तेथे मैत्रीपूर्ण लढत दिली. दुसरीकडे महायुतीला विरोध करण्यासाठी विरोधकांनी मूठ बांधली. मदन कारंडे, सागर चाळके, संजय कांबळे यांनी ताकद लावली. पहिल्या टप्प्यात या शिवशाहू आघाडीचा जोर दिसत नव्हता; पण शेवटच्या टप्प्यात त्यांनी आव्हान निर्माण केले. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आघाडीचे नेते संजय कांबळे आणि सागर चाळके यांच्या कन्या हिमानी पाटील यांचा पराभव झाला. आवाडे यांचे निकटवर्तीय सुनील पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला.








