सोलापूरमध्ये सत्ता राखण्यात भाजप ठरला यशस्वी

महाराष्ट्र टाइम्स

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. १०२ पैकी ८७ जागा जिंकून भाजपने आपली सत्ता पुन्हा स्थापन केली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपची सदस्य संख्या लक्षणीय वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक विद्यमान नगरसेवकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले होते.

सोलापूरमध्ये सत्ता राखण्यात भाजप ठरला यशस्वी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ८७ जागा मिळवून आपली सत्ता मोठ्या फरकाने कायम राखली आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे ४९ नगरसेवक निवडून आले होते. यंदा यामध्ये ३८ सदस्य संख्या वाढली आहे. सोलापुरातील चार आमदार आणि एका पालकमंत्र्यांनी मागील दोन ते तीन महिन्यांपासून भाजपासाठी लावलेली ताकद कामाला आली आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ‘पुलोद’चा प्रयोग वगळता ४५ वर्षांपासून महापालिकेत ठाण मांडून असलेल्या काँग्रेसला २०१७ च्या निवडणुकीत धोबीपछाड देऊन १०२ पैकी तब्बल ४९ जागा जिंकून भाजपने इतिहास रचला होता. त्या वेळी रिंगणात प्रथमच उतरलेल्या एमआयएमने नऊ जागा जिंकून महापालिकेत जबरदस्त प्रवेश केला होता. शिवसेनेने २१ जागा मिळविल्या होत्या. त्या वेळी काँग्रेसला मात्र १४ जागांवरच समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस ४, बहुजन समाज पार्टी ४ आणि माकपने १ जागा जिंकली होती.

आठ वर्षानंतर यंदा झालेल्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यातील सत्तेचा भाजपला मोठा फायदा झाला आणि सलग दुसऱ्यांदा भाजपने सोलापूर महापालिकेची सत्ता सर्वाधिक ८७ नगरसेवक निवडून आणून ताब्यात ठेवण्यात मोठे यश मिळविले. निवडणुकीत भाजपला सर्व १०२ जागांवर उमेदवार मिळाले. मात्र, अन्य पक्षांना उमेदवार मिळविताना मोठी दमछाक करावी लागली. भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आणि ‘७५ प्लस’चे स्वप्न पूर्ण करण्याचा इरादा पक्का केला होता. त्याहीपेक्षा जास्त जागा निवडून आल्या आहेत.