शहराला पाणी पुरवठा करणारी बाराशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी (१६) सकाळी फुटली. जलवाहिनी फुटल्याचे लक्षात येताच पाणी पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठाही ठप्प झाला आहे.
शहराला पाणी पुरवठा बाराशे मिलीमीटर आणि सातशे मिलीमीटर व्यासाच्या दोन जलवाहिनीद्वारे होतो. त्यातील जायकवाडी नवीन पंपगृह नजीक शंभर एमएलडी योजनेवरील बाराशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. अचानक मोठ्या प्रमाणात जलवाहिनीला गळती लागल्याचे लक्षात आले. यानंतर नवीन पंपगृह येथून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. तोपर्यंत लाखो लीटर पाणी वाया गेले. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
दुपारनंतर जलवाहिनी दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली असून दुरुस्तीच्या कामाला बारा ते तेरा तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी पहाटेपर्यंत काम चालेल, असे सांगण्यात येते. यानंतर पाणी पुरवठा सुरू होऊ शकतो. शहराला जोडणारी ही मुख्य जलवाहिनी असून यावरच शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. तीच जलवाहिनी बंद असल्याने पाणी वितरणाची प्रक्रिया ठप्प आहे. दुरुस्तीनंतर शहरातील जलकुंभ भरण्यास सुरुवात होईल. त्यानंतर पाणी पुरवठा करण्यात येईल. दुरुस्तीला लागणारा वेळ पाहता सुमारे एक दिवस पाणी पुरवठा लांबणीवर जाऊ शकतो. पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बिघडल्याने अनेक भागात निर्जळी झाली. शनिवारी दुपारनंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात येते. बाराशे मिलीमिटर व्यासाची बंद असली तरी सातशे व नऊशे या दोन्ही मिलीमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजना सुरू असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.








