मुंबई : खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असून ‘आम आदमी का हात, काँग्रेस के साथ’ आहे, असा स्पष्ट संदेश उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी दिला. उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात कुर्ला, चांदिवली, कलिना, वांद्रे पूर्व-पश्चिम हा परिसर येतो. येथील सर्वाधिक नगरसेवक काँग्रेस, शिवसेना उबाठाचे आहेत. त्या खालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. यामुळे केवळ मुस्लिमच नव्हे, तर मराठी आणि अन्य भाषिक मतदारांचाही काँग्रेसवरच विश्वास असल्याचे या मतदानातून स्पष्ट झाले.
वांद्रे येथील मातोश्रीच्या परिसरासह सर्वच विधानसभा क्षेत्रातील प्रभागांत शिवसेना उबाठाने वर्चस्व दाखवून दिले. मध्यमवर्गीयांसह सर्व स्तरातील लोकवस्तीतील मतदारांनी ठाकरेंची मशाल धगधगती ठेवली. वांद्रे पूर्व प्रभाग क्रमांक ८७मध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची कन्या पूजा महाडेश्वर यांनी सुरुवातीच्या दोन फेऱ्यांतील पिछाडी भरून काढत तिसऱ्या फेरीनंतर आघाडी घेत विजय मिळवला. हा विजय शिवसेना उबाठावर मतदारांचा विश्वास दाखवून देत, हीच खरी शिवसेना असल्याचे स्पष्ट करतो. प्रभाग क्रमांक ८८मध्ये श्रवरी परब यांनी पहिल्याच फेरीपासून आघाडी घेत भाजपचा पराभव केला, तर ८९मध्ये गीतेश राऊत यांनी मोठ्या मताधिक्याने शिवसेनेच्या उमेदवारावर मात केली.
वांद्रे पूर्वमधील प्रभाग क्रमांक ९० ही संपूर्ण मतदारसंघातील सर्वांत चुरशीची लढत ठरली. काँग्रेसच्या ॲड. तुलिप मिरांडा यांनी अवघ्या सात मतांनी विजय मिळवला. 'मुंबई महापालिका निवडणूक २०२६' मधील सर्वांत कमी मतांनी मिळालेला विजय म्हणून निवडणुकांच्या इतिहासात याची नोंद झाली. शिवसेना (उबाठा), समाजवादी पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाले. भाजपच्या ज्योती उपाध्याय यांना ५,१९० आणि मिरांडा यांना ५,१९७ मते मिळाली. शिवसेना उबाठाच्या अन्सारी मसुद अब्दुल कासिम यांनी तब्बल चार हजारांहून अधिक मते घेत कडवी झुंज दिली. समाजवादी पक्षाच्या सना कुरेशी यांना दोन हजार आणि अपक्ष जॉर्ज अब्राहम रिक्षा चिन्हावर सव्वादोन हजारांहून अधिक मते मिळाली. एका मतदाराचे मतही निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे असते, हेच या निकालातून स्पष्ट झाले. ९२मध्ये कॉंग्रेसच्या मोहम्मद इब्राहिम कुरेशी यांनी ८,५८६ मतांनी विजय मिळवला. शिवसेनेच्या हाजी सालीम कुरेशी यांना ४,२७४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युसूफ माड़ी यांना ३,८२३ मते मिळाली.
चांदिवलीमध्ये शिवसेना आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात थेट संघर्ष दिसून आला. प्रभाग १५६ मध्ये शिवसेनेच्या अश्विनी माटेकर यांनी सहज विजय मिळवला असला, तरी १५७ मध्ये शिवसेना उबाठाच्या डॉ. सरिता म्हस्के यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत करत आपली ताकद सिद्ध केली. १६३मध्ये शिवसेनेच्या शैला लांडे विजयी झाल्या. याच प्रभागात मतदानाच्या दिवशी आमदार दिलीप लांडे यांनी मतदान केंद्राबाहेर एका कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली होती. या घटनेमुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण होते. १६२मध्ये माजी मंत्री नसीम खान यांचा मुलगा काँग्रेसचे आमिर खान यांनी ११,३०७ मतांनी विजय मिळवला. या प्रभागात दुसऱ्या क्रमांकाच्या शिवसेनेचे वाजिद कुरेशी यांना ७,९०६ मते मिळाली. प्रभागात काँग्रेसला मानणारा मोठा मतदारवर्ग असल्याने येथे आमिर खान यांचा विजय सुकर झाला.
कलिना भागात काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चुरस पाहायला मिळाली. प्रभाग १६५मध्ये काँग्रेसच्या अशरफ आजमी यांनी भाजपच्या उमेदवारावर मात करत विजय मिळवला, तर प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांना मतदारांनी नाकारले. त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर गेले. प्रभाग १६६ मध्ये शिवसेनेच्या कोट्यधीश उमेदवार मीनल तुर्डे यांच्यासह १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मीनल यांचा ६,४३५ मतांनी विजय झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे मनसेचे राजन खैरनार (४,४८०), काँग्रेसचे घनश्याम भापकर (३,२८६) आहेत. नोटाच्या २५८ मतांसह नऊ अपक्षांनी एकूण ३,८१६ मते मिळवली.
कुर्ला परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांचे वर्चस्व ठळकपणे दिसले. १६८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ सईदा खान यांना (८,२७७) आणि शिवसेना उबाठाचे ॲड. सुधीर खातू (७,५०८) यांच्यात चुरशीची लढत झाली. यात डॉ. सईदा खान यांनी ७६९ मतांनी आघाडी घेत बाजी मारली. ऐनवेळी भाजपच्या एबी फॉर्मवर अर्ज दाखल केलेल्या डॉ. अनुराधा पेडणेकर यांना भाजप कार्यकर्त्यांची नाराजी भोवल्याने त्यांना तिसऱ्या स्थानावर (५,०२९) मतांवर समाधान मानावे लागले. समाजवादी पक्षाच्या मोहम्मद राशिद शेख यांना १,२०८ मते मिळाली. १७० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बुशरा नदीम (कप्तान) मलिक यांनी पावणेसहा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. मलिक यांना ९,२५२ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या ॲड. रंजिता दिवेकर (३,४५५) आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या मोमीन तबरेज यांना (२,६५९) समाधान मानावे लागले. १७१ मध्येही शिवसेना उबाठाच्या ॲड. राणी येरुणकर यांनी विजय मिळवत कुर्ल्यातील शिवसेना उबाठाची ताकद अधोरेखित केली.








