सकाळी दहाचा काटा सरकताच कुर्ल्यातील मनपा शाळा, नेहरूनगरमधील शिवसृष्टी तसेच, विद्यापीठ परिसरातील मतमोजणी केंद्रांबाहेरील वातावरणात कमालीची अस्वस्थता जाणवत होती. कोण जिंकणार, कोण पिछाडीवर पडणार, याची उत्कंठा प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. प्रत्येक फेरीच्या निकालासोबत आशा-निराशेचे मळभ दाटून येत होते.
आघाडी-पिछाडीच्या घोषणांनी क्षणाक्षणाला वातावरण तापत असतानाच, अखेर विजयी उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आणि आनंदाला उधाण आले. गुलालाची उधळण, घोषणांचा गजर आणि गळाभेटींनी मतमोजणी केंद्रांबाहेर जल्लोष उसळला. तर, पराभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिका निवडणुका जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आधीच नवचैतन्य संचारले होते. प्रचाराच्या काळात आणि मतदानाच्या दिवशी दिसलेला उत्साह मतमोजणीच्या दिवशीही कायम होता. ‘आपलाच उमेदवार जिंकणार’ या आत्मविश्वासाने कार्यकर्ते सकाळपासूनच केंद्राबाहेर गर्दी करू लागले. सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रापासून १०० मीटर अंतरावरच कार्यकर्त्यांना थांबवण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी व्यक्त होत असली तरी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. शिवसृष्टीतील केंद्राबाहेर रस्त्याच्या एका बाजूला एसटी आगारात कार्यकर्त्यांची गर्दी, तर दुसऱ्या बाजूला पोलिस फळी तैनात होती. स्पीकर आणि स्क्रीनच्या माध्यमातून मतमोजणीचा ‘आखो देखां हाल’ कार्यकर्त्यांना अनुभवता येत होता.
महापालिका शाळा आणि विद्यापीठ परिसरातही स्पीकरवरून निकालाची माहिती दिली जात असल्याने तेथे मोठी गर्दी जमली होती. केंद्रालगतची बहुतांश दुकाने बंद होती. मात्र चहाच्या टपऱ्यांवर चहा, कॉफी, उकाळा, बिस्किटे आणि मस्कापाववर कार्यकर्त्यांनी चांगलाच ताव मारला. निकालांदरम्यान पराभूत उमेदवार कुठे कमी पडला, कोणत्या विभागात मते घटली, कुठे बंडखोरीचा फटका बसला आणि कुठे आघाडी लाभली, यावर रंगतदार चर्चा सुरू होती.
केंद्रात प्रवेश करताना उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याने काही ठिकाणी किरकोळ शाब्दिक खटके उडाले. मात्र मोबाइल बंदीचा नियम असल्याचे पोलिसांनी कडक शब्दांत सांगताच कार्यकर्ते शांत झाले. एकीकडे विजयी उमेदवाराच्या समर्थकांचा जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे पराभवाची छाया घेऊन काही कार्यकर्ते शांतपणे माघारी परतताना दिसले. उत्सुकता, आनंद आणि शांतता या तीन भावनांचा अनोखा संगम मतमोजणी केंद्रांबाहेर दिवसभर अनुभवायला मिळाला.








