कोल्हापूरवर महायुतीचा झेंडा

महाराष्ट्र टाइम्स

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला. भाजपने २५, शिवसेनेने १५ आणि अजित पवार गटाने ४ जागा जिंकल्या. महायुतीला एकूण ४४ जागा मिळाल्या. काँग्रेसला ३५ जागा मिळाल्या. जनसुराज्य शक्ती पक्षाने एक जागा जिंकली. शिवसेना ठाकरे गटाला एक जागा मिळाली. महायुतीची सत्ता स्थापन झाली.

historic victory of mahayuti in kolhapur municipal corporation

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले. महायुतीने ८१ जागांपैकी ४४ जागा जिंकून सत्तांतर घडविले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शेवटपर्यंत चिवट झुंज दिली. काँग्रेसला ३५ जागा मिळाल्या.

कोल्हापूर महापालिकेत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता स्थापन होत आहे. जनसुराज्य शक्ती पक्षानेही एक जागा जिंकून विजयाचा गुलाल उधळला. शिवसेना ठाकरे पक्षाला एक जागा मिळाली; तर आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळाली नाही. अपक्ष उमेदवारांचा टिकाव लागला नाही.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २५, शिवसेनेला पंधरा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला चार जागा मिळाल्या. या तीनही पक्षांनी कोल्हापुरात महायुती म्हणून निवडणूक लढविली होती. महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सभा झाल्या. या निवडणुकीत महायुतीकडून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांनी नेतृत्व केले.

दुसरीकडे खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेसने शहरात ताकद दाखवून दिली; पण आमदार पाटील यांना महापालिकेत सत्ता राखता आली नाही. या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने अंतिम टप्प्यात उडी घेऊन २९ जागा लढविल्या होत्या. ‘जनसुराज्य’कडून अक्षय विक्रम जरग विजयी झाले. शिवसेना ठाकरे पक्षालाही गटबाजीला फटका बसला. ठाकरे पक्षाकडून प्रतिज्ञा महेश उत्तुरे विजयी झाल्या.