अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या युतीने ६८ पैकी तब्बल ५२ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षांनी गेल्या वेळच्या निडणुकीपेक्षा जास्त जागा मिळविल्या आहेत; तर शिवसेना शिंदे गटाने १० जागा जिंकून अस्तित्व राखले. एके काळच्या सत्ताधारी शिवसेना ठाकरे गटाला या वेळी अवघी एक जागा मिळाली. काँग्रेसला मुस्लिमबहुल प्रभागात दोन; तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळू शकलेली नाही. एमआयएम पक्षाने मिळविलेल्या दोन जागाही लक्षणीय ठरल्या आहेत. सर्वाधिक २७ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी आपली शहरावरील पकड सिद्ध केली.
नगरला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाली होती. शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्रपणे; तर महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविली. आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीकडून; तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी भाजपकडून धुरा सांभाळली. शिवसेना शिंदे गटाची सूत्रे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्याकडे होती. त्यांना स्वतःलाच पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून खासदार नीलेश लंके प्रचारात उतरले होते. लोकसभा निवडणुकीत दाखविलेला करिष्मा त्यांना या वेळी दाखविता आला नाही. त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. नगरपालिकांनंतर आता महापालिका निवडणुकीतही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
गेल्या वेळी म्हणजे २०१८ मधील निवडणुकीत एकत्रित शिवसेनेला २४, एकत्रित राष्ट्रवादीला १८, भाजपला १४, काँग्रेसला ५, बहुजन समाज पक्षाला ४, समाजवादी पक्षाला १ व अपक्ष १ असे बलाबल होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची कामगिरी चांगलीच सुधारल्याचे दिसून येते. तर शिवसेनेला फुटीनंतर मोठा फटका बसल्याचे दिसते.
आता राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्याने त्यांचाच महापौर होणार, अशी चर्चा असली, तरी ‘यासंबंधीचा निर्णय युतीचे पदाधिकारी एकत्र बसून घेतील,’ असे विखे यांनी सांगून याबद्दलची उत्सुकता ताणली आहे.
केडगाव ठरले लक्षवेधी
केडगाव उपनगर आणि मुकुंदनगर या भागातील निवडणूक या वेळी लक्षवेधी ठरली. मुकुंदनगर या मुस्लिमबहुल प्रभागात युती आणि शिवसनेने उमेदवारच दिले नव्हते. तेथे एमआयएम आणि काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत झाली. मतदारांनी या दोन्ही पक्षांचे समान म्हणजे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून दिले; तर केडगावमध्येही ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी अपक्ष उमेदवार देऊन वेगळा प्रयोग केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. पूर्वी शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने वादग्रस्त ठरलेले श्रीपाद छिंदम यांना प्रमुख पक्षांनी उमेदवारी दिली नाही. त्यांनी बसपकडून निवडणूक लढविली आणि पुन्हा विजयी झाले.








