मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष शुक्रवारी सकाळपासून लागले होते. थोडी भीती, प्रचंड धाकधूक, चेहऱ्यावर दाटून आलेली चिंता, कुठे अटीतटीची लढाई तर, कुठे अगदी सहजसोपी आघाडी घेत मुंबईच्या पहिल्या चार प्रभागांमधून महायुतीने विजय मिळवला. पहिल्या दोन प्रभागांतून विजय मिळाल्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर मुंबईत वर्चस्व गाजवणारच, असा आनंद व्यक्त केला. या आनंदासोबतच जय श्रीरामाचा गजरही झाला.
उत्तर मुंबईच्या प्रभाग एक आणि प्रभाग दोन मधून अनुक्रमे शिवसेनेच्या रेखा यादव आणि भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झाला. कार्यकर्त्यांपर्यंत थेट फोनवरून बातम्या येत होत्या. पक्षाचे, उमेदवारांचे कार्यकर्ते बाहेर येऊन काही माहिती देत होते. मतमोजणी केंद्राच्या बाहेर ज्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नव्हती, त्यांचे लक्ष मोबाइलच्या स्क्रीनवरील बातम्यांच्या चॅनलवर खिळून राहिले होते. प्रभाग दोनमध्ये तेजस्वी घोसाळकर पिछाडीवर असे सुरुवातीला चॅनलच्या बातम्यांमधून कळताच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षणभर अस्वस्थता पसरली. मग मात्र हे चित्र स्पष्ट झाले आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरू झाला. रेखा यादव यांच्या विजयाची प्रतीक्षा करत अनेक अमराठी समर्थक मतमोजणी केंद्राजवळ उभे होते. रेखा यादव यांच्या विजयाच्या वृत्तानंतर गुलालाची उधळण झाली तर, तेजस्वी घोसाळकर यांच्या निकटवर्तीयांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. मुंबईच्या या पहिल्या दोन प्रभागांतील विजयाने महायुतीच्या मुंबईतील विजयाची पायाभरणी केल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मुंबईवर सत्ता महायुतीचीच आहे, हेही या प्रातिनिधिक चित्रामुळे लक्षात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाग एक आणि दोनची मतमोजणी झाल्यानंतर पुढील दोन्ही प्रभागांच्या मतमोजणीला सुरुवात झाली.
प्रभाग तीनमध्ये प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. त्या तुलनेत शिवसेना उबाठाच्या रोशनी गायकवाड यांना मोठे समर्थन मिळाले नाही. प्रभाग चारमध्ये पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये शिवसेनेचे मंगेश पांगारे आणि शिवसेना उबाठाचे राजू मुल्ला यांच्यात अटीतटीची लढाई सुरू होती. तिसऱ्या फेरीअखेर हा फरक वाढला आणि पांगारे यांचा विजय झाला आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निकाल कळताच मुल्ला यांच्या निकटवर्तीयांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. मुल्ला यांनी कायमच लोकांची कामे केल्याने त्यांच्या विजयाची आशा होती, अशा प्रतिक्रिया उबाठाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.








