नगरसेवक-मतदारांमध्ये संवाद व्हावा

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईतील प्रदूषण आणि पर्यावरणाबाबत जनजागृती वाढली आहे. 'मुंबई क्लायमेट वीक'च्या माध्यमातून नागरिकांना हवामान बदलाच्या प्रक्रियेत सामील करून घेतले जाईल. शाळा, वस्त्यांपर्यंत हवामानाची चर्चा पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. 'प्रोजेक्ट मुंबई' संस्थेने पुढाकार घेतला असून फेब्रुवारीत मुख्य कार्यक्रम होणार आहे. युवक आणि महिला यात नेतृत्व करतील.

mumbai climate week need for dialogue on pollution and climate change

मुंबईमधील प्रदूषण, मुंबईचे पर्यावरण, मुंबईतील नद्यांचे पर्यावरण यासंदर्भात अधिकाधिक जनजागृती होत असून येत्या काळात मुंबईतील नगरसेवकांनी याचे भान बाळगणे गरजेचे असल्याची अपेक्षा मुंबईकरांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. या दृष्टीने विविध संस्था प्रयत्न करत असून ‘मुंबई क्लायमेट वीक’च्या माध्यमातूनही हे प्रयत्न करण्यात येणार आहेत. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या सामान्य जनतेला या प्रक्रियेत सामील करून घेणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

जाहीरनाम्यातील आश्वासने केवळ कागदावर राहू नयेत, यासाठी नागरिक आणि धोरणकर्ते यांच्यामध्ये संवाद होणे गरजेचे आहे. यामध्ये हवामानावरची चर्चा बंद दाराआडून बाहेर काढून शाळा, वस्त्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास सोसणाऱ्या समुदायांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही परिषद नसून ही हवामान बदलांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सुरू झालेली चळवळ आहे.

‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून फेब्रुवारीमध्ये मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या बैठका आणि माहितीपट, फिल्म स्क्रीनिंग, कार्यशाळा यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. हे कार्य फेब्रुवारीनंतरही सुरू राहणार आहे. याचे काम उष्णतेच्या लाटा, पूर आणि पायाभूत सुविधांचा विकास, ऊर्जा आणि हरित नोकऱ्यांच्या संधी, अन्नसाखळीमध्ये शाश्वत शेती आणि पोषण सुरक्षा या मुद्द्यांच्या आधारे चालणार आहे. हवामान बदलावर काम करणाऱ्या स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांशी जोडले जाण्यासाठीही हा मंच काम करणार आहे. ‘मुंबई क्लायमेट वीक’ केवळ हवामान बदलावर चर्चा करण्यापुरता मर्यादित कार्यक्रम नाही. हे एक उदाहरण असेल जिथे नागरिक हवामानविषयक प्राधान्यक्रम ठरवतील, असे ‘मुंबई क्लायमेट वीक’चे संस्थापक शिशिर जोशी यांनी सांगितले. युवक आणि महिला केवळ सहभागी न होता नेतृत्व करतील, असेही ते म्हणाले.