मुंबई महापालिका निवडणुकीचा शुक्रवारी लागणाऱ्या निकालाचा उत्साह जसा उमेदवारांमध्ये तसा कार्यकर्त्यांमध्येही होता. त्यामुळे मुलुंड टी वॉर्ड आणि एस वॉर्ड असलेल्या भांडुप, कांजूरमार्ग आदींमधील एकूण दहा प्रभागांचा निकाल ऐकण्यासाठी मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहाबाहेर शिवसेना उबाठा, भाजप, मनसे, काँग्रेससह अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांची सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र हळूहळू होणाऱ्या फेऱ्या आणि आघाडी-पिछाडीमुळे काही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, तर काही कार्यकर्ते निराश झाल्याचे दिसून आले.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले मुंबई महापालिका निवडणुकीचे रणकंदन शुक्रवारी निकालाच्या दिवशी संपुष्टात येणार असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. टी वॉर्ड असलेल्या मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०३ ते १०८ आणि एस वॉर्डमधील १०९, ११०, ११३ आणि ११४ मधील मतमोजणी ही मुलुंड पश्चिमेकडील कालिदास नाट्यगृह येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात ठेवली होती. प्रथम सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीला काहीसा उशीर झाला. प्रथम पोस्टल मतदानाची मोजणी झाली आणि त्यानंतर प्रभागातील मतपेट्या उघडण्यास सुरुवात झाली. मतमोजणी केंद्राबाहेर सकाळी नऊ वाजल्यापासूनच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. दहा वाजेपर्यंत ही गर्दी वाढली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने असल्याने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही होता. यावेळी महिला कार्यकर्त्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. मतमोजणी हळूहळू होत असल्याने आणि निकालही बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना वेळेत उपलब्ध होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून उद्घोषणेद्वारे नीट माहिती दिली जात नसल्याने कार्यकर्ते पोलिसांना जाऊन बाहेरील कार्यकर्त्यांना मतमोजणीची नीट माहिती द्यावी, अशी विनवणी करत होते. त्यानंतर ही माहिती नीट देण्यास सुरुवात झाली. प्रथम मुलुंडमधील प्रभाग क्रमांक १०३ आणि प्रभाग क्रमांक १०४मधील मतमोजणीला सुरुवात झाली. यामधील आघाडी आणि पिछाडी जसजशी कार्यकर्त्यांना कळत गेली, तेव्हा अनेक कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढू लागली. भाजप, मनसे, काँग्रेससह अन्य पक्षांचे उमेदवारही मतमोजणी केंद्रात ये-जा करत होते. तर, कार्यकर्ते त्यांच्याकडून काही माहिती घेत होते. प्रभाग क्रमांक १०३मधून भाजपच्या डॉ. हेतल गाला मोरवेकर यांनी मनसे आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. तर, प्रभाग क्रमांक १०४ मधून भाजपचे प्रकाश गंगाधरे यांनी मनसे आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. पराभूत उमेदवारांचे कार्यकर्ते यावेळी प्रचंड निराश दिसत होते. तर, उपस्थित महिला कार्यकर्त्यांना अश्रू आवरता येत नव्हते. काँग्रेसचे कार्यकर्तेही शांत होते. तर, विजयी उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते. निकालानंतर कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. सुरुवातीचा निकाल हाती येताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जवळील चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेत ‘चाय पे चर्चा’ सुरू केली.








