कुठे गुलालाची उधळण, कुठे सामसूम

महाराष्ट्र टाइम्स

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. विविध प्रभागांतील निकालांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि काही ठिकाणी निराशेचे वातावरण होते. काही उमेदवारांनी आघाडी घेतली तर काही पिछाडीवर राहिले. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता.

कुठे गुलालाची उधळण, कुठे सामसूम
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस यांना जवळपास सारखाच हात दिलेल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील ४३ प्रभागांसाठी पाच मतमोजणी केंद्रांत शुक्रवारी मतमोजणी सुरू झाली. या पाचही केंद्रांबाहेर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. एका वेळी दोनच प्रभागांची मतमोजणी होत असल्याने उरलेल्या प्रभागांतील कार्यकर्ते, उमेदवार यांचा जीव टांगणीला लागला होता. त्यातच मतमोजणी होत असलेल्या उमेदवारांमध्येही एखाद्या फेरीत आघाडी, तर पुढल्या फेरीत पिछाडी असे चित्र असल्याने संमिश्र भावना होत्या.

मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलावाजवळ (शांताराम तलाव) असलेल्या कुरार व्हिलेज मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रभाग क्रमांक ३६ ते ४५ची मतमोजणी होती. सुरुवातीला प्रभाग ३६ आणि ३७ची मोजणी सुरू झाल्यावर बाहेर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. सुरुवातीला प्रभाग क्रमांक ३६मधून मनसेचे प्रशांत महाडिक यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजप उमेदवार सिद्धार्थ शर्मा आणि त्यांचे कार्यकर्ते गप्प होते. ही आघाडी तिसऱ्या फेरीपर्यंत कायम होती. पण त्यानंतर सिद्धार्थ शर्मा यांनी मुसंडी मारत निर्णायक विजयी आघाडी मिळवली.

दुसऱ्या बाजूला ३७ क्रमांकाच्या प्रभागातून शिवसेना उबाठाच्या योगिता कदम यांनी भाजपच्या प्रतिभा शिंदे यांच्यावरील आपली आघाडी कायम ठेवली होती. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार, असे चित्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलावापासून कुरार गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी होती, तर त्यांना आवरण्यासाठी पोलिस बंदोबस्तही होता. गोरेगाव पश्चिमेकडील उन्नतनगर मुंबई पब्लिक स्कूलमध्ये असलेल्या मतमोजणी केंद्रावर प्रभाग क्रमांक ५१चा निकाल जाहीर झाला आणि त्यात शिवसेनेच्या वर्षा टेंबवलकर यांचा विजय झाल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला. मतमोजणी केंद्राबाहेर ही गडबड होऊ नये, म्हणून पोलिसांनी लगेचच या कार्यकर्त्यांना आवर घालत बाजूला केले. वर्षा टेंबवलकर विजयी प्रमाणपत्र घेऊन बाहेर आल्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या विक्रम राजपूत यांचाही प्रभाग क्रमांक ५० मधून विजय झाल्याची बातमी थडकली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

प्रभाग क्रमांक ७३मधून खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेना उबाठाच्या लोना रावत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. वायकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश करत खासदारकीची निवडणूक अवघ्या ४८ मतांनी जिंकली होती. त्यामुळे ही पराभवाची परतफेड मानली जाते. प्रभाग ७४मध्येही मनसेच्या विद्या आर्या-कांगणे यांनी भाजपच्या उज्ज्वला मोडक यांना धोबीपछाड देत निवडणूक जिंकली. अंधेरी पश्चिम येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथील मतमोजणी केंद्रात प्रभाग क्रमांक ५९ आणि पुढील मतमोजणी सुरू झाली. काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि भाजप या तीनही पक्षांचे कार्यकर्ते उत्सुकतेने वीरा देसाई मार्गावर जमले होते. या प्रभागातून उबाठा पक्षाचे यशोधर फणसे यांचा विजय झाला आणि भगवा गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी वीरा देसाई रोडची कोंडी केली.

एसएनडीटी विद्यापीठ, जुहू परिसरातही हीच गत होती. प्रभाग क्रमांक ८४ आणि ८५ येथील लढतींच्या मतमोजणीच्या वेळी कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सुरुवातीला प्रभाग ८४ मधून मनसेच्या रुपाली दळवी यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे अंजली सामंत यांच्या गोटात शुकशुकाट होता. मात्र पुढील फेऱ्यांमध्ये सामंत यांनी मोठी आघाडी घेतल्यावर मनसेच्या इंजिनाची शिटी काहीशी मंदावली. मनसेच्या चेतन बेलकर आणि भाजपच्या मिलिंद शिंदे यांच्यातील लढत काहीशी एकतर्फी झाली, तरी पहिल्या फेरीत बेलकर यांना चांगली मते पडल्याने उत्साह वाढला होता. पण दुसऱ्याच फेरीत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतली आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.