‘अंतिम सामन्या’तही पोलिस विजयी, केली चोख आखणी

महाराष्ट्र टाइम्स

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. हनुमाननगर झोनमधील मतमोजणी केंद्रावर उमेदवार आणि समर्थकांची गर्दी जमली होती. पोलिसांनी संदल वाजवणाऱ्यांना विचारणा केली. मतमोजणीनंतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. ड्रोनद्वारेही पाळत ठेवण्यात आली. पोलिसांनी निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

police victory in municipal elections eloquent security arrangements

हनुमाननगर झोनमधील मतमोजणी केंद्र परिसरात उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी जमली. विजयी उमेदवाराला संदल लागेलच, यामुळे कोणीही न बोलावता संदलवाले तेथे थडकले. आपला उमेदवार समोर आहे, ही माहिती बाहेर येताच संबंधित उमेदवारांचे समर्थक घोषणा देत. या घोषणेबरोबरच संदलही वाजे. त्याला कोणी बोलावले, हे मात्र कोणालाच माहिती नव्हते. पोलिसांनी संदल पथकातील एकाला विचारणा केली. ‘साहब, हमे किसने नही बुलाया हम खुद ही आये हैं’, असे त्याने सांगितले. ‘संदल वाजवून ओवाळणी टाकतात. हीच ओवाळणी आमचा मोबदला आहे’, अशी माहितीही त्याने दिली.एकाने दोनशे रुपयांचे गुलाबपुष्प आणून त्याचे दहा हार बनवले व ते परिसरात शंभर रुपयांना विकून संधीचे सोने केले.

मतमोजणीनंतर पराभूत उमेदवारांचे समर्थक गोंधळ घालण्याची शक्यता होती. परंतु, पोलिसांनी मतदान केंद्रालाही गराडा घातला. मतमोजणीनंतर शहरात कोणतीही अनुचित घटना न घडल्याने महापालिका निवडणुकीचा अंतिम सामनाही पोलिसांनी जिंकला. सतत बंदोबस्तात असलेले पोलिस रिलॅक्स झाले.

महापालिका निवडणुकीसाठी पोलिसांनी बंदोबस्ताची चोख आखणी केली. शहरातील साडेपाच हजार पोलिसांशिवाय अन्य जिल्ह्यांतील एक हजार पोलिस नागपुरात दाखल झाले. त्यांच्या मदतीला होमगार्ड व राज्य राखीव पोलिस दलाचे जवान होते. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी साहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात १५०पेक्षा अधिक पोलिस व होमगार्ड तैनात करण्यात आले. पोलिसांनी मतमोजणी केंद्राच्या ५० मीटरवरच घेराबंदी केली. पासधारकांनाच मतमोजणी केंद्राकडे सोडण्यात आले. केंद्राच्या बाहेर व आतही तगडी सुरक्षाव्यवस्था होती.

सर्वाधिक संवेदनशील मतमोजणी केंद्रांपैकी एक असलेल्या हनुमाननगर झोनमधील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय आहे. या मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था साहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्याकडे होती. मतदानानंतर मतमोजणी केंद्रापर्यंत इव्हीएम पोहोचविण्यासह मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत काही तास सोडले तर ते या केंद्रात तळ ठोकून होते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल व पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनीही या मतमोजणी केंद्राला भेट दिली.

मतमोजणी संथगतीने होत असल्याने उमेदवारांच्या समर्थकांचा संताप उडाला. त्यामुळे त्यांनी केंद्राबाहेर काही काळ गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. हिवरे यांनी त्यांची समजूत घातल्याने तणाव निवळला. अनेक महत्त्वाच्या मतमोजणी केंद्र परिसरात ड्रोनद्वारेही पाळत ठेवण्यात आली. महापालिका निवडणुकीची प्रक्रिया संपली असली तरी पराभूत उमेदवार व त्यांचे समर्थक काय करू शकतात, याची माहिती घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.