करिअरपेक्षा तरुणांना महापालिकेची ‘काळजी’

महाराष्ट्र टाइम्स

महापालिका निवडणुकीच्या निकालाची धाकधूक आता तरुणांमध्येही दिसून येत आहे. अनेक तरुण आपल्या करिअरपेक्षा या निकालाला अधिक महत्त्व देत आहेत. सोशल मीडियावर याबद्दलच्या पोस्ट्स आणि मीम्स व्हायरल होत आहेत. अभ्यास आणि नातेसंबंधांपेक्षाही निकालाची चिंता अधिक वाटत आहे. निकालाच्या प्रत्येक फेरीसोबत सोशल मीडियावर चर्चा वाढत आहे. महापालिका निकाल हा तरुणांसाठी केवळ राजकीय घडामोड नसून तो त्यांच्या भावना आणि भविष्याशी जोडलेला आहे.

करिअरपेक्षा तरुणांना महापालिकेची ‘काळजी’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

महापालिका निवडणूक निकालाची धाकधूक केवळ राजकीय वर्तुळापुरती मर्यादित न राहता थेट तरुणांपर्यंत पोहोचली असल्याचे यंदा दिसून आले. मोबाइलवर सतत अपडेट्स पाहणे, टीव्हीवरील ब्रेकिंग न्यूजकडे लक्ष ठेवणे, व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करणे, यामधून तरुणांची अस्वस्थता दिसत होती. या सर्व घडामोडींचे प्रतिबिंब सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमटले.

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर)वर शेअर होणाऱ्या पोस्ट आणि मीममधून तरुणांच्या भावना व्यक्त होत होत्या. ‘करीअरपेक्षा जास्त टेन्शन मला महापालिकेच्या रिझल्टचे आलेय’ अशा आशयाच्या पोस्ट्स व्हायरल होत होत्या. ‘माझं करिअर, अभ्यास, नातेसंबंध सगळे बाजूला ठेवलेय; फक्त निकाल महत्त्वाचा वाटतोय,’ अशा भावना पोस्ट आणि स्टेटसमधून व्यक्त होत होत्या. काही तरुणांनी वहीत लिहिलेल्या ओळी, स्टेटस स्वरूपातील पोस्ट किंवा रीलच्या माध्यमातून अस्वस्थता व्यक्त केली. ‘करिअरचा निकाल शांतपणे स्वीकारला, पण महापालिकेचा निकाल झोप उडवतोय,’ अशा प्रतिक्रियाही दिसून आल्या. निकालाच्या प्रत्येक फेरीसोबत लाइक, कमेंट आणि शेअरचा वेग वाढला होता. या सगळ्या पोस्टमधून एक गोष्ट ठळकपणे समोर येत होती ती म्हणजे महापालिकेचा निकाल तरुणांसाठी केवळ राजकीय घडामोड राहिलेली नाही तर, तो त्यांच्या भावना, अपेक्षा आणि भविष्याशी निगडित विषय आहे, याची त्यांना झालेली जाण.