महायुतीने सर्व जागांवर केलेला दावा आणि महायुतीच्या प्रचाराचा झंझावत यामुळे उबाठाचे अस्तित्वच उरणार नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला होता. मात्र उबाठा आणि मनसेच्या उमेदवारांनी स्वत:च्या ताकदीवर १२ जागांवर मिळवलेला विजय उल्लेखनीय ठरला.
महापालिकेचे प्रथमच पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत मतमोजणी वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्यात आली. या सर्व केंद्रावर सकाळपासूनच उमेदवारांनी गर्दी केली होती. मतदान केंद्रावरून कोणती माहिती मिळते याकडे कार्यकर्त्यांचे कान लागले होते. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी ११.३० वाजता पहिला विजय प्रत्येक केंद्रावर जाहीर करण्यात आला. यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोल-ताशाच्या गजरात विजयी उमेदवारांचा जल्लोष केला.
मागील काही दिवसापासून डोंबिवलीतील प्रभाग क्र. २९मध्ये शिवसेना-भाजपमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डीएनसी शाळेकडील रस्ता वाहतुकीसाठी बंद करत शाळेच्या एका बाजूने भाजप कार्यकर्त्यांसाठी तर दुसऱ्या बाजूला शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबावे, निवडणूक निकालानंतर कोणीही जल्लोष आणि विजयी मिरवणूक काढू नये, यासारख्या सूचना पोलिसाकडून देण्यात आल्या होत्या. या केंद्रावर मतमोजणी पाऊणतास उशिराने सुरू झाली. सकाळीच आमदार राजेश मोरे यांनी या केंद्रावर हजेरी लावत मतमोजणीची माहिती घेतली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास या केंद्रावर एकाच वेळी तिन्ही प्रभागांचे निकाल घोषित करण्यात आले. प्रभाग क्र. २९मधील भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे समजताच शिवसेना उमेदवार, कार्यकर्ते तिथून बाहेर पडले.
कल्याणामध्येही शांततेत मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीच्या अखेरीस उमेदवारांना आपल्याला मिळणाऱ्या मतांचा अंदाज आल्याने हरणाऱ्या उमेदवारांनी काढता पाय घेतला. या निवडणुकीत मित्रपक्षाकडूनच कुरघोडी करण्यासाठी विरोधी पक्षातून लढणाऱ्या उमेदवारांची पाठराखण केल्याचे दिसून आले. यामुळे उबाठा आणि मनसेला नव्हे तर कॉंग्रसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला देखील या निवडणुकीत खाते उघडता आले.
काही प्रभागांत संध्याकाळी उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. जसजसे निकाल हाती लागत होते तसतसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता. डोंबिवलीतील तीन केंद्राची मतमोजणी ४ वाजण्याच्या सुमारास संपली असली तरी कल्याणातील मतमोजणी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होती.








