घोरपडी येथील एम्प्रेस गार्डनमध्ये येत्या २३ ते २७ जानेवारी दरम्यान पुष्पप्रदर्शन भरविण्यात येणार आहे. विविध प्रकारची, लहान मोठ्या आकारातील रंगीबेरंगी शेकडो फुलांच्या आकर्षक रचना, बोन्साय आणि दुर्मीळ वनस्पती हे यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण आहे. यंदाचे प्रदर्शन ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे.
‘पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते २३ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. माधव गाडगीळ हे संस्थेचे मानद सदस्य होते. त्यांच्या निधनाने झालेली हानी भरून न येणारी असून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्घाटनानंतर विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया संस्थेच्या उपाध्यक्ष सुमन किर्लोस्कर आणि मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनात मांडण्यात येणाऱ्या जपानी पद्धतीच्या इकेबाना कलात्मक पुष्परचना आणि विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष पुणेकरांचे आकर्षण ठरणार आहेत. पुण्यासह कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिक यात सहभागी होणार आहेत. बागप्रेमींसाठी फुलांची मांडणी, फळे-भाजीपाला आणि आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. २७ जानेवारीपर्यंत दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे, असे पिंगळे यांनी सांगितले.






