ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उष्माघातामुळे टेनिसपटू स्पर्धेबाहेर

महाराष्ट्र टाइम्स

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उष्माघाताचा फटका बसला. कॅनडाच्या फेलिक्स अगर आलियासिम आणि मरिना स्ताकुसिच यांना निर्जलीकरणाचा त्रास झाला. दोघांनाही चालणे कठीण झाले. आलियासिमने सामना अर्धवट सोडला. स्ताकुसिच कोर्टवर कोसळली. प्रतिस्पर्धी प्रिसिला हॉनने तिची मदत केली. या घटनेमुळे खेळाडूंच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

heat stroke causes two tennis players to withdraw from australian open
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत सोमवारी निर्जलीकरणाच्या (डिहायड्रेशन) त्रासामुळे दोन टेनिसपटूंना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. कॅनडाच्या फेलिक्स अगर आलियासिम आणि मरिना स्ताकुसिच या दोघांनाही पायात गोळे येण्याचा त्रास जाणवू लागल्याने आपले सामने अर्धवट सोडावे लागले. या तीव्र उकाड्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते, त्यामुळे त्यांना व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली.

फेलिक्स अगर आलियासिम, जो सातवा मानांकित खेळाडू आहे, याला सुरुवातीला चालणेही कठीण झाले होते. त्याला व्हीलचेअरवर कोर्टवर आणण्यात आले. त्याने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला, पण उष्णतेमुळे त्याला पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे २५ वर्षीय आलियासिमने नुनो बोर्जेसविरुद्धचा सामना अर्धवट सोडला. त्यावेळी आलियासिम ६-३, ४-६, ४-६ असा पिछाडीवर होता. "अशा उकाड्यात सर्वोच्च स्तरावरील टेनिस खेळणे आणि सर्वोत्तम योगदान देणे खूप कठीण झाले होते. मी एक सेट प्रयत्न केलाही; पण शक्य झाले नाही. त्राणच उरला नव्हता," असे आलियासिमने सांगितले.
दुसरीकडे, मरिना स्ताकुसिच हिची अवस्था अधिक बिकट झाली. यजमान ऑस्ट्रेलियाच्या प्रिसिला हॉन हिने विजयी सलामी दिली, कारण स्ताकुसिचला पायात गोळे येत असल्याने माघार घ्यावी लागली. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये ३-५ अशी पिछाडीवर असताना स्ताकुसिच कोर्टवरच कोसळली. पायातील वेदना इतक्या असह्य झाल्या की ती अक्षरशः कळवळत होती. स्ताकुसिच हिला व्हीलचेअरवर बसवण्यासाठी तिची प्रतिस्पर्धी प्रिसिला हॉन हिने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह मदत केली. प्रिसिलाने स्ताकुसिचचा दुखावलेला पाय ताठ रहावा यासाठी तो अलगद उचलून धरला होता. या खिलाडूवृत्तीचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. "मला असे जिंकायचे नव्हते. स्ताकुसिचला लवकर बरे वाटेल अशी आशा आहे. मी ऑस्ट्रेलियन असल्याने अशा उन्हाची मला सवय आहे. अशा उष्णतेत तुमची मानसिकताही महत्त्वाची ठरते," असे प्रिसिला म्हणाली.