छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मुख्य सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. सभागृहातील आसनव्यवस्थादेखील नवी आहे. सभागृहातील महापौरांच्या खुर्चीला विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीसारखे रूप देण्यात आले आहे. सभागृहातील टेबलांना कोरियन शीटचे कव्हर लावण्यात आले आहे.
महापालिकेच्या मुख्य सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम चार-साडेचार वर्षांपासून सुरू होते. निवडणुकीच्या मतदानाच्या दोन-तीन दिवस आधीच हे काम पूर्ण करण्यात आले. सभागृहाला ‘स्मार्ट टच’ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सभागृहात महापौरांसाठी प्रशस्त मंच तयार करण्यात आला आहे. महापौरांसाठी भारदस्त खुर्ची या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या खुर्चीचे रूप विधानसभा अध्यक्षांसाठीच्या खुर्चीसारखे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ही खुर्ची बेंगळुरू येथील एका एजन्सीकडून तयार करून घेण्यात आली आहे. खुर्चीला एक बटण देण्यात आले असून बटण दाबल्यावर खुर्ची आपोआप पुढे आणि मागे जाऊ शकते. मंचावर महापौरांसह उपमहापौर, आयुक्त आणि सचिवांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या खुर्च्याही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. मंचाच्या समोर सचिव कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी कक्ष तयार करण्यात आले आहेत. सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तयार करण्यात येते.







