मातृभाषेतील शिक्षण धोक्यात : मेणसे

महाराष्ट्र टाइम्स

प्रा. आनंद मेणसे यांनी मातृभाषेतील प्राथमिक शिक्षणाच्या धोक्यावर चिंता व्यक्त केली. शाळा आणि शिक्षक नसल्याने, तसेच ग्रंथालयांना अनुदान नसल्याने भाषिक आणि सांस्कृतिक प्रश्न निर्माण होत आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अर्धशिक्षित तरुणांची मोठी संख्या रस्त्यावर येईल. कर्नाटक सीमाप्रश्नही अजून अनुत्तरित आहे, तर महाराष्ट्राकडून ठोस पाऊले उचलली जात नाहीत.

मातृभाषेतील शिक्षण धोक्यात : मेणसे
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण नियोजनबद्ध पद्धतीने संपवले जात आहे. शाळा नाहीत, शिक्षक नाहीत. ग्रंथालयांना अनुदान नाही, सांस्कृतिक पातळीवर काही होत नाही. प्राथमिक शाळा चालल्या नाहीत, भाषेचे प्रश्न सुटले नाहीत तर दहा वर्षात अर्धशिक्षित, अशिक्षित तरुणांच्या फौजांच्या फौजा रस्त्यावरुन फिरताना दिसतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचे अभ्यासक प्रा. आनंद मेणसे यांनी सोमवारी व्यक्त केले.

विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेत ते बोलत होते. महाविद्यालयातर्फे पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘विवेकानंद व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. पहिले पुष्प प्रा. आनंद मेणसे यांनी गुंफले. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर अक्षय शिसोदे, प्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘ कर्नाटक सीमाप्रश्न : भाषा, संस्कृती व राजकारण’ विषयावर पुढे प्रा. मेणसे म्हणाले, स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात दीर्घ व अनुत्तरीत चळवळ म्हणून या दोन राज्यांच्या सीमेवरील ८६५ गावांच्या लढ्याकडे पहावे लागेल. कित्येक आयोग, संमेलने, सत्याग्रह व इतर प्रयत्न होऊन देखील आजपर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही. कर्नाटक सरकार दिवसेंदिवस मराठी भाषा व अस्मितेबाबत कठोर होत असताना महाराष्ट्राकडून भाषा बांधवांसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाहीत. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण थांबवा असे आजचे धोरण झाले आहे. देशाची प्राथमिकता प्राथमिक शाळा नसेल तर या देशाला भवितव्य काय असेल. सीमाभागात तर बहुसंख्येन एकशिक्षकी शाळा आहेत. एक शिक्षकच पहिलीपासून ते चौथीपर्यंतचे सर्व वर्ग घेतो. हळुहळू या शाळा बंद होतील. खेडेगाव, दुर्गम भाग, डोंगराळ भागातील प्राथमिक शाळा बंद पडली तर पहिले मुलींचे शिक्षण बंद होईल. सांस्कृतिक, शैक्षणिक मुद्दे निर्माण होत आहेत. शिक्षक नाहीत, शाळा नाहीत, सांस्कृतिक पातळीवर काही होत नाही. ग्रंथालयांना अनुदान नाही, अशी स्थिती आहे. ग्रंथालयाशिवाय, प्राथमिक शाळेशिवाय समाज काय असेल, त्याचा विकास कसा होईल, हे प्रश्न गंभीर आहेत, असे ते म्हणाले. कार्यक्रमानंतर विद्यार्थी, नागरिकांकडून आलेल्या प्रश्नांना प्रा. मेणसे यांनी सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक व पालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. सूत्रसंचालन प्रा. शर्मिष्ठा ठाकूर यांनी केले.