मुंबईत महापौर महायुतीचाच

Contributed byउपमुख्यमंत्री|महाराष्ट्र टाइम्स

मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीत महायुतीचाच महापौर होणार हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाही यावर शिक्कामोर्तब झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विरोधकांचे प्रयत्न शक्य असले तरी महायुतीचे संख्याबळ पुरेसे आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले होते, मात्र आता सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबईत महापौर महायुतीचाच
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाच मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ऐन वेळी काही चमत्कार घडेल, अशा वावड्या उडवल्या जात आहेत; तसेच सत्ताधारी महायुतीतील एक घटकपक्ष पडद्याआडून शिवसेना (उबाठा) पक्षाशी हातमिळवणी करीत असल्याची जोरदार अफवाही पसरवण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असून, मुंबईत महायुतीचाच महापौर बनवण्याचे निश्चित झाले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला महापौर बनवण्याइतपत संख्याबळ मिळाले आहे. त्याच वेळी विरोधकांनी त्यांचा महापौर बनवण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवल्यास तेही शक्य असल्याची चर्चा आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल,’ असे वक्तव्य केल्याने या चर्चेला आणखी उधाण आले. साहजिकच एकनाथ शिंदे यांच्याविरोधातील राग व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पडद्यामागून सत्ताधारी महायुतीमधील एका घटक पक्षासोबत चर्चा करीत असल्याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम देणारी माहिती पुढे आली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या वृत्तास सोमवारी दुजोरा दिला.