वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेची कोंडी अखेर फोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आक्रमक झाले आहे. भारतात खेळण्याबाबतचा अंतिम निर्णय आज, गुरुवारपर्यंत घ्या, असे आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डास सांगितले आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतल्यास त्याच्याऐवजी स्कॉटलंडला प्रवेश देण्याचे ठरवले आहे.
आयसीसीच्या कार्यकारिणीची बुधवारी बैठक झाली. त्यात भारतात न खेळण्याच्या निर्णयावर बांगलादेश कायम राहिल्यास त्यांच्याऐवजी अन्य संघास खेळवण्याचा निर्णय आयसीसीच्या बहुसंख्य संचालकांनी घेतला. आयसीसीच्या १६ संचालकांपैकी केवळ पाकिस्ताननेच बांगलादेशला पाठिंबा दिल्याचे समजते. बांगलादेशच्या भारताऐवजी श्रीलंकेत खेळण्याच्या भूमिकेस आपला पाठिंबा आहे, असे पत्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंगळवारी रात्री आयसीसी; तसेच संलग्न देशांना पाठवले होते. त्यामुळे तातडीने बैठक आयोजित करण्याचा निर्णय झाला.
बुधवारी ऑनलाइन झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा होते. त्यात बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शमी सिल्वा, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष माईक बेईर्ड, झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तेवेंगा मुकुहलानी, क्रिकेट वेस्ट इंडिजचे अध्यक्ष किशोर शॅलो, क्रिकेट आयर्लंडचे प्रमुख ब्रायन मॅकनेईस, क्रिकेट न्यूझीलंडचे प्रतिनिधी रॉजर टूस, इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन, क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचे प्रतिनिधी महंमद मूसाजी; तसेच क्रिकेट अफगाणिस्तानचे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ हेही उपस्थित होते.
संलग्न सदस्यांचे प्रतिनिधी मुबाशशीर उस्मानी, महिदा वल्लीपूरम, आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता, आयसीसीचे उपाध्यक्ष इमरान ख्वाजा आणि आयसीसीचे व्यवस्थापक गौरव सक्सेना यांचाही सहभाग होता. गेल्या आठवड्यात बांगलादेश दौऱ्यावर गेलेले आयसीसीच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अँड्र्यू एफग्रेव हे खास निमंत्रित होते.






