नागपूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिर येथून गणेश जयंतीनिमित्त आज, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शोभायात्रा निघणार आहे. याशिवाय, दिवसभर विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येतील.
गणेश जयंतीनिमित्त होणाऱ्या उत्सवाला बुधवारी सुरुवात झाली. त्याअंतर्गत गणेशपूजन, नवग्रहपूजन व वास्तुपूजन, गणेशयाग झाला. हा गणेशयाग मंदिराचे वेदमूर्ती आचार्य यज्ञेश दीक्षित, पं. संकेत देशमुख, पं. विश्वनाथ शर्मा, ब्रह्मवृंद आहूश व्यास, शंभू टानपे, अजिंक्य कुळकर्णी, नीलेश शर्मा, रघुनाथ शर्मा यांच्या पौरोहित्याखाली होत आहे. यागाचे प्रमुख यजमान अभिषेक अग्रवाल असून आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता गणेशयागाची पूर्णाहुती होईल. याप्रसंगी श्री गणेशाची फुलांची आकर्षक शेज सजविण्यात येणार असून मंदिरातर्फे तिळाच्या रेवडीचा प्रसाद भक्तांना वितरित करण्यात येणार आहे. गणेश जयंतीनिमित्त सायंकाळी ५ वाजता मंदिरातून शोभायात्रेला प्रारंभ होईल. ही शोभायात्रा मानस चौकातून अन्सारी रोड, राजस्थानी महिला मंडळ, मॉरिस कॉलेज टी-पॉइंट, व्हरायटी चौक, सीताबर्डी मेन रोड, लोखंडी पूलमार्गे पुन्हा मानस चौकातून गणेश मंदिरात परत येईल. शोभायात्रेत भगवान गणेशाचा रथ, आकर्षक चित्ररथ, घोडे, बँड, ढोल-ताशा पथक, विद्युत रोशणाई तसेच मंगल कलश पथक सहभागी होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रेसाठी विशेष समितीचे गठन करण्यात आले असून बर्डी मेन रोडवरील व्यापारीवर्गाचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. याशिवाय मंदिरातर्फे रविवार, २५ जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या कार्यकारिणी मंडळातर्फे करण्यात आले आहे.
शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी मंदिराचे अध्यक्ष श्रीराम कुळकर्णी, उपाध्यक्ष अरुण व्यास, सचिव दिलीप शहाकार, सहसचिव सुनील अग्निहोत्री, कोषाध्यक्ष हरीलक्ष्मण भालेराव, विश्वस्त अरुण कुळकर्णी, विकास लिमये, शांतीकुमार शर्मा, शरद वैद्य, कमलसिंग चोप्रा, वासुदेव गंगवाणी यांचे सहकार्य लाभत आहे.







