बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत सप्टेंबर महिन्यापासून सतत वाढ होत आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने सरोवर आणि परिसरातील जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता पर्यावरणतज्ज्ञांनी वर्तविली आहे. या गंभीर विषयाकडे सर्वप्रथम ‘महाराष्ट्र टाइम्स’ने लक्ष वेधले. या वृत्तमालिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दखल घेऊन स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर जगातील दुर्मीळ ‘मेटिओराइट क्रेटर’ मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही संशोधनासाठी लोणारला मोठे महत्त्व आहे. पर्यटकांसोबतच जगभरातील संशोधकही येथे येत असतात. लोणार सरोवराच्या काठावरील विराज धारातीर्थावरील गोमुखातून अखंड धारेचा प्रवाह वाढला आहे. सरोवराच्या तळाजवळील रामगया झराही प्रवाहित झाला आहे. यातून दहा एचपी मोटारपंपा इतक्या क्षमतेने पाणी वाहत आहे. सीतान्हाणी आणि पापहरेश्वर कुंडाजवळूनही पाणी वाहते. हे चार स्रोत अखंड वाहत असल्याने सरोवरातील जलपातळी वाढू लागली. कमळजामाता मंदिरासमोरील दीपमाळ अर्धी पाण्याखाली गेली. वाढत्या जलपातळीने सरोवराचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील भूजलतज्ज्ञ प्रा. अशोक तेजनकर यांनी तहसीलदार भूषण पाटील यांना सोबत घेऊन सरोवराची पाहणी केली. आता न्यायालयाने दखल घेऊन स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. ॲड. मोहित खजांची यांची या प्रकरणी न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली.






