बाल आणि पौगंडावस्थेतील मुलामुलींच्या सशक्त अभिनयाने संपन्न चित्रपट हे यंदाच्या ‘पिफ’चे वैशिष्ट्य. लमियाची भूमिका करणारी बनीन अहमद नाइफ असो किंवा रोहिंग्यावरील ‘लॉस्ट लँड’मधील शफीची भूमिका केलेल्या चार वर्षांचा निरागस शौफिक राइसउद्दीन अशा अनेकांच्या चेहऱ्याने केवळ चित्रपटाचाच नाही, तर ‘पिफ’चाही पडदा व्यापला. दक्षिण मोरोक्कोच्या वाळवंटात मुलीचा शोध घेणारा सिरात चित्रपट, मराठीतील ‘सोहळ ा’, ‘जीव’, ‘तो , ती आणि फुजी’ , बाप्या हे चित्रपटही त्यास अपवाद नाहीत.
पुणे : नव्वदचे दशक. प्यायला पाणी नाही आणि खाण्यास अन्न नाही, असे गाव. नऊ वर्षांच्या लमियाला वर्गशिक्षक अध्यक्षाच्या वाढदिवसानिमित्त केक तयार करण्यास सांगतात. ती आजीकडे केकच्या साहित्यासाठी हट्ट धरते. आजी तिला शहरात नेते; पण कामासाठी आणि संगोपनासाठी एका कुटुंबाच्या हवाली करते. आजीने केकच्या साहित्यासाठी आपल्याला इथे आणलेले नाही, हे कळताच लमिया हिंदी नामक कोंबड्यासह पळ काढते. तिला काही करून केकचे साहित्य मिळवायचे असते. नातीला शोधणाऱ्या आजीला रुग्णालयात दाखल करावे लागते. केक तयार होतो; पण आता आजी तिच्या सोबत नसते. शिक्षक केक कापतात आणि बॉम्ब पडतो...
रोम जळत होते; तेव्हा नीरो फिडल वाजवत होता, या म्हणीप्रमाणे लोक भूकबळीने मरत होते; तेव्हा अध्यक्ष सद्दाम हुसेन पन्नासावा वाढदिवस साजरा करीत होते. हसन हादी लिखित आणि दिग्दर्शित ‘द प्रेसिडेंट्स केक’ हा चित्रपट म्हणजे याच जळजळीत आणि विषण्ण वास्तवाची जाणीव. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर १६ मे २०२५ रोजी कान महोत्सवात झाला. ९८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये (ऑस्कर) सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी इराककडून या चित्रपटाची निवड झाली होती. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) हा चित्रपट गाजला. हा चित्रपट पाहण्यासाठी बुधवारी प्रेक्षकांच्या रांगा लागल्या होत्या.
इराकमध्ये अण्वस्त्रे आहेत, या आरोपाखाली अमेरिकेने सद्दाम हुसेन यांना फासावर चढवले, हा अलीकडचा इतिहास. या देशाकडे आजतागायत अण्वस्त्रे सापडलेली नाहीत. सद्दाम हुसेन यांच्या मृत्यूनंतर इराकची पूर्ण वाताहत झाली. मात्र, हुकूमशहाच्या राज्यातील व्यवस्था कशी असते आणि लोक त्याच्याप्रति इतके वेडे असतात की त्यांना वर्तमानाचीही जाण राहत नाही, यावर हा चित्रपट भाष्य करतो.







