शिवसेनेचा भाजपला शह

महाराष्ट्र टाइम्स

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने मनसेसोबत आघाडी केली आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या चार नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठला आहे. यामुळे ५० नगरसेवक असलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावे लागण्याची शक्यता आहे. मनसेसह शिवसेना-मनसे आघाडी गटाची नोंदणी करण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे.

shiv sena dealt a blow to bjp in kalyan dombivli opportunities for power formation in the municipality

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्याचा धडाका भाजपने कल्याण-डोंबिवलीत लावला होता. मात्र, केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर नमते घेतले; परंतु अंबरनाथमधील प्रकारानंतर दोन्ही पक्षांत धुसफूस सुरू होती. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत बुधवारी भाजपला शिवसेनेने शह दिला.

शिवसेना -मनसे आघाडी गटाची नोंदणी करीत; तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाच्या चार नगरसेवकांचा पाठिंबा मिळवून शिवसेनेने महापालिकेत बहुमतापर्यंत मजल मारली, तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही भाजपला विरोधी बाकावर बसावे लागू शकते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १२२ सदस्यांच्या सभागृहात शिवसेनेचे ५३, भाजपचे ५०, शिवसेना (उबाठा) पक्षाचे ११ आणि मनसेचे सहा असे संख्याबळ आहे. निकाल जाहीर होताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या दोन नगरसेवकांशी संपर्क साधला. त्यानंतर हे दोन्ही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाले. त्यातच मनसेने शिवसेना (उबाठा) पक्षाच्या चिन्हावर लढलेल्या दोन नगरसेवकांना गळाला लावले. त्यानंतर मनसेच्या सहा नगरसेवकांनी थेट शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकण भवन येथे नोंदणी करून शिवसेना-मनसे आघाडी स्थापली. त्यामुळे शिवसेनेचे ५३, मनसेचे सहा आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे चार मिळून शिवसेनेकडे ६३ नगरसेवक झाले. सत्तास्थापनेसाठी ६२ संख्याबळ गरजेचे आहे. श्रीकांत शिंदेंच्या खेळीमुळे ५० नगरसेवक असलेल्या भाजपला कल्याण-डोंबिवली महापालिकेत विरोधी बाकावर बसावे लागेल, अशी चिन्हे आहेत. शिवसेनेकडून मनसेला उपमहापौरपदासह स्थायी समिती सदस्यपद देण्याचे आश्वासन मिळाल्याने मनसे प्रथमच पालिकेतील महत्त्वाच्या स्थानावर बसेल.

‘शिवसेनेच्या नगरसेवकांनी आणि मनसेने गट स्थापन केला आहे. निवडणूकप्रमाणेच महापौरही महायुतीचाच असेल. मनसेने महायुतीला समर्थन दिले आहे,’ असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत आम्ही महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पदांपेक्षा सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे मनसे नेते राजू पाटील यांनी स्पष्ट केले.