पैशाच्या वादातून एका विधी संघर्षग्रस्त मुलाने गुरुवारी रात्री तरुणाची हत्या केली. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घडली. योगेश अनिल काकडे (वय २८, रा. श्रीकृष्णनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, योगेशला दारूचे व्यसन होते. आठ दिवसांपूर्वी त्याने १७ वर्षीय विधी संघर्षग्रस्त मुलाकडून दारूसाठी पैसे घेतले होते. मात्र, दिलेले पैसे परत न मिळाल्याने तो योगेशकडे वारंवार तगादा लावत होता. यावरून या अल्पवयीन आरोपीने मृतकाला बेसा–मानेवाडा मार्गावरील अस्सल मराठा सावजी हॉटेलसमोर गाठले. आरोपीने योगेशवर चाकूने वार केले. यात योगेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गेल्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची हत्या करण्यात आल्याने शुक्रवारी नागपूर जिल्हा हादरला. आरोपींमध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
पहिल्या घटनेत कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फेटरी परिसरात, चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. रुचिका राजेश भांगे (वय २१, रा. वेलकम सोसायटी, बोरगाव) असे मृत तरुणीचे नाव असून सौरभ शिवदास जामगडे (वय २६, रा. कळमेश्वर) असे आरोपीचे नाव आहे.
रुचिका आणि सौरभची पूर्वीपासूनची ओळख होती. पोलिस भरतीची तयारी करीत असल्याने ती पोलिस लाइन टाकळी येथे सरावासाठी जायची. यावरून सौरभच्या मनात संशय निर्माण झाला होता. त्याने हटकल्यानंतरही ती ऐकत नव्हती. रुचिकाला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने सौरभ तिला फेटरी येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. येथे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून सौरभने तीक्ष्ण शस्त्राने रुचिकाच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली.
हिंदुत्ववादी कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणाव
दुसऱ्या घटनेत गिट्टीखदान परिसरात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. हर्ष ऊर्फ गुड्डू पांडे (वय ३८, रा. कामगारनगर) असे मृतकाचे नाव आहे. आर्थिक वादातून ही हत्या झाली असून याला जुन्या वैमनस्याचीही पार्श्वभूमी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पांडे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असल्याने या संघटनांनी आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडे यांचा भाऊ संदीपने राहुल वैरागडे याच्याकडून १० हजार रुपये घेतले होते. मात्र, संदीपने पैसे परत न केल्याने त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. गुरुवारी रात्री राहुल आणि बंटी ऊर्फ बुरहान शेख ऊर्फ बंटी पंथेलावाला (रा. अवस्थीनगर चौक) हे दोघे संदीपचा शोध घेत होते. त्याच वेळी त्यांना हर्ष दिसले. दोघांनीही त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला चढविला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.






