विकासकामांचा बार

महाराष्ट्र टाइम्स

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये १,७१५ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. दिब्रुगड येथे नवीन विधानसभा संकुल आणि आमदार निवासाची पायाभरणी झाली. अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्याचेही उद्घाटन झाले. शहा यांनी राहुल गांधींवर ईशान्य भारताचा अनादर केल्याचा आरोप केला. आसामचा चहा युरोपमध्ये शून्य शुल्कासह निर्यात होईल, असेही त्यांनी सांगितले.

विकासकामांचा बार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाममध्ये १,७१५ कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. दिब्रुगड येथे नवीन विधानसभा संकुल आणि आमदार निवास बांधले जाणार आहे, ज्यासाठी २८४ कोटी रुपये खर्च येणार आहे. याशिवाय, अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्याचेही लोकार्पण करण्यात आले. या दौऱ्यादरम्यान, शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 'ॲट होम' कार्यक्रमात गमछा (स्कार्फ) परिधान करण्यास नकार देऊन ईशान्य भारताचा अनादर केल्याचा आरोप केला. भाजपची सत्ता असेपर्यंत ईशान्येच्या संस्कृतीचा अवमान सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच, भारत आणि युरोपीय महासंघातील मुक्त व्यापार करारामुळे आसामचा चहा युरोपीय देशांमध्ये शून्य शुल्कासह निर्यात होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आसामच्या दिब्रुगड शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी १,७१५ कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात दिब्रुगड येथे उभारण्यात येणाऱ्या दुसऱ्या विधानसभा संकुलाचा समावेश आहे. या सोहळ्याला आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. गुवाहटीनंतर आता दिब्रुगड येथेही एक नवीन प्रशासकीय केंद्र उभारण्याची योजना केंद्र आणि राज्य सरकारने आखली आहे.
या योजनेचाच एक भाग म्हणून, दिब्रुगड येथे दुसऱ्या विधानसभा संकुलाची आणि आमदार निवासाची पायाभरणी अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रकल्पासाठी तब्बल २८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या नवीन संकुलामध्ये तीन मजली विधानभवन, नऊ मजली आमदार निवास, आठशे आसनांची क्षमता असलेले एक मोठे सभागृह आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी कक्ष अशा आधुनिक सुविधा असतील.

याशिवाय, अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्याचेही लोकार्पण अमित शहा यांच्या हस्ते झाले. या टप्प्यासाठी २३८ कोटी रुपये खर्च आला आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी २०९ कोटी रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर, २९२ कोटी रुपये खर्चाच्या वन्यजीव आरोग्य व संशोधन केंद्राची पायाभरणीही शहा यांच्या उपस्थितीत पार पडली.

दिब्रुगड येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार टीका केली. "राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनी आयोजित केलेल्या 'ॲट होम' या कार्यक्रमादरम्यान गमछा (स्कार्फ) परिधान करण्यास नकार देऊन राहुल गांधी यांनी ईशान्य भारताचा अनादर केला," असा गंभीर आरोप शहा यांनी केला. ते पुढे म्हणाले की, "या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व नेत्यांनी तसेच, विदेशी पाहुण्यांनीही ईशान्य भारताचा सन्मान करत गमछा परिधान केला. परंतु, यास राहुल यांनी त्यास नकार दिला."

शहा यांनी ठामपणे सांगितले की, "राहुल गांधी हे त्यांना हवे ते करू शकतात; परंतु भाजपची सत्ता आहे तोपर्यंत त्यांना ईशान्येच्या संस्कृतीचा अवमान करू दिला जाणार नाही." त्यांनी काँग्रेसवर आसामच्या विकासात अडथळा आणल्याचा आरोप करत म्हटले की, "तुमच्या पक्षाने बंदुका, गोळ्या, संघर्ष, तरुणांचे मृत्यू याशिवाय आसामला काय दिले? आसाममध्ये आमची सत्ता आल्यापासून घुसखोरी रोखण्यात आली."

यावेळी बोलताना अमित शहा यांनी आसामच्या चहा उद्योगासाठी एक मोठी खुशखबर दिली. "भारत आणि युरोपीय महासंघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे आसामचा चहा युरोपीय देशांत शून्य शुल्कासह निर्यात होईल," अशी ग्वाही त्यांनी दिली. दिब्रुगड हे चहाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शहा म्हणाले की, "आसाम जगभरात चहासाठी प्रसिद्ध आहे. येथील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या परिश्रमामुळेच आसामच्या चहाला ही ओळख लाभली आहे. पंतप्रधान मोदी यांनी युरोपीय महासंघाशी केलेल्या या करारामुळे येथील प्रसिद्ध चहा आता पॅरिस आणि बर्लिनपर्यंत शून्य शुल्कासह पोहोचणार आहे."