‘उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रशासनाची जाण असणारे नेते होते. वक्तशीरपणा हा त्यांच्या ठायी होता. वेळेचे महत्त्व जाणणारा एक मोठा नेता आपल्यातून निघून गेला,’ अशा शब्दांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड तसेच अधिकारी- कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
अजित पवार यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी स्वामी यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बोलतांना जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, ‘प्रशासनाची जाण असणारा एक मोठा नेता म्हणून अजितदादा सगळ्यांच्या स्मरणात राहतील. समाजातील सर्व थरातील लोकांशी त्यांचा थेट संपर्क होता. प्रश्नांची जाण असणे, ते सोडविण्यासाठी अथक परिश्रम करण्याची तयारी असणे हे त्यांचे महत्त्वाचे गुण होते. वक्तशीरपणा हा त्यांच्या ठायी होता. वेळेचे महत्त्व जाणणारा नेता आपण गमावला आहे.’
निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.








